Banner News

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी राजू मिसाळ यांची नियुक्ती

By PCB Author

September 07, 2020

पिंपरी,दि.०७(पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे पालिकेत जनतेतून निवडून आलेले 36 नगरसेवक होते. त्यातील कोरोनामुळे ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने, जावेद शेख यांचे दुर्दैवाने निधन झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ 34 वर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दरवर्षी विरोधी पक्षनेता बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पिंपरी-चिंचवड महापालिकेत विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी निगडी, प्राधिकरणातील ज्येष्ठ नगरसेवक राजू मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव आज (दि.7) नगरसचिवांकडे जमा करण्यात आला. विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे अधिकृत नोंदणी झाल्यानंतर महापौर उषा ढोरे या मिसाळ यांच्या नियुक्तीची घोषणा करतील.

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता चौथ्यावर्षी निगडी, प्राधिकरणातील ज्येष्ठ नगरसेवक राजू मिसाळ यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपविली आहे. मिसाळ राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. त्यांची नगरसेवकपदाची तिसरी टर्म आहे. यापूर्वी त्यांनी उपमहापौर, क्रीडा समिती सभापती, प्रभाग समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. स्थायी समितीचे दोन वर्षे सदस्य देखील ते होते.

पहिल्यावर्षी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील योगेश बहल, दुस-यावर्षी भोसरी मतदारसंघातील चिखलीचे प्रतिनिधित्व करणारे दत्ता साने, तिस-यावर्षी चिंचवडमधील पिंपळे सौदागरचे प्रतिनिधीत्व करणारे नाना काटे यांच्याकडे पद देण्यात आले होते. एक वर्षाचा कालावधी संपल्याने काटे यांनी 2 सप्टेंबर रोजी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला होता. विरोधी पक्षनेते पदासाठी माजी महापौर वैशाली घोडेकर, माजी उपमहापौर राजू मिसाळ, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यात रस्सीखेच होती. त्यात मिसाळ यांनी बाजी मारली आहे.

दरम्यान पालिकेची आगामी निवडणूक 15 महिन्यांवर येवून ठेपली आहे. पक्षाला जनतेसमोर जायचे आहे. पालिकेत पुन्हा सत्ता आणण्यासाठी मिसाळ यांना आक्रमक भूमिका घ्यावी लागणार आहे. सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडावे लागेल. चुकीच्या कामाला प्रखर विरोध करावा लागणार आहे.