पिंपरी चिंचवड महापालिकेचे आता मिशन टेस्टिंग

0
257

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – कोरोना चाचण्या कमी होत असल्याने निश्चित कोरोना बाधित किती आहेत त्याचा नेमका अंदाज येत नाही. त्यासाठी आता मोठ्या प्रमाणावर चाचण्या कऱण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड महापालिकेने केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेने आता ‘मिशन टेस्टिंग’ हाती घेतले आहे. त्यानुसार अवघ्या अर्ध्या तासात कोरोना चाचणीचा अहवाल देणाऱ्या रॅपिड टेस्टिंगच्या एक लाख कीट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जलद निदान, जलद उपचार शक्य होणार असून कोरोनाला रोखण्यात या कीट महत्वाची भूमिका बजाविणार आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरु आहे. संपूर्ण शहराला कोरोनाने अक्षरश: विळखा घातला आहे. झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढला आहे. शहरातील तब्बल दीड हजार रुग्ण झोपडपट्यांमधील आहेत. 2,558 रुग्ण शहरात आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेने आता ‘मिशन टेस्टिंग’ हाती घेतले आहे.

याबाबत आयुक्त हर्डीकर म्हणाले, महापालिकेने एक लाख रॅपिड टेस्ट किट्स मागविल्या आहेत. या किटच्या माध्यमातून झोपडपट्ट्यांतील नागरिकांची अँटीजेन तपासणी करता येईल. अँटीजेन तपासणीमुळे किती लोक निगेटीव्ह आणि पॉझिटीव्ह आहेत, याचा अंदाज बांधता येवू शकेल. साधारण साडेचारशे रुपये त्याचा दर ठरविला आहे. त्यामुळे जलद स्क्रिनिंग करुन देता येईल. ती कन्फम टेस्ट नाही. त्यासाठी त्यांची पुन्हा तपासणी करावीच लागेल. पण, निगेटीव्ह कोण आहेत. ते लवकर समजेल आणि कोरोनाची लागण झालेले किती रुग्ण आहेत, त्याचा अंदाज येऊन त्यांच्यावर तत्काळ उपचार केले जातील. या तपासणी प्रणालीचा वापर करण्यास सुरुवात करत आहोत. त्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. रॅपिड टेस्टिंगद्वारे अवघ्या अर्ध्या तासात कोरोना चाचणीचा अहवाल येतो. नेमके कोणावर उपचार करायचे आहेत, हे लक्षात येईल. त्या पद्धतीने नियोजन करत आहोत. या माध्यमातून कर्मचा-यांचेही सर्व्हिलन्स वाढविले जाईल, असेही आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.