पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएममध्ये डॉक्टरांकडून रुग्णसेवेच्या नावाखाली लूट; आयुक्तांकडे चौकशीची मागणी

0
1457

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील अनेक डॉक्टर बाहेर स्वतःचे क्लिनिक व दवाखाने चालवत आहेत. वायसीएम रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवर तातडीने शस्त्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे अनेक रुग्ण नाईलाजास्तव खासगी रुग्णालयात दाखल होतात. वायसीएम रुग्णालयात अनेक गैरप्रकार सुरू असून, त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जन अधिकार संघटनेने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात संघटनेचे अध्यक्ष माजीद शेख यांनी आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “वायसीएम रुग्णालयात पहाटे तातडीक सेवा उपलब्ध करून दिली जात नाही. त्यावेळी डॉक्टर उपलब्ध नसतात. रुग्णालयातील अनेक डॉक्टरांचे बाहेर स्वतःचे क्लिनिक व दवाखाने आहेत. वायसीएम रुग्णालयात येणाऱ्या रुग्णावर तातडीने उपचार करणे टाळले जाते. तसेच शस्त्रक्रिया कराव्या लागणाऱ्या रुग्णांवर लवकर शस्त्रक्रियेसाठी केली जात नाही. त्यामुळे अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल होतात. रुग्णांना मोफत औषधे देणे बंधनकारक आहे. परंतु, वायसीएमचे डॉक्टर बहुतांश रुग्णांना वायसीएममध्ये उपलब्ध नसलेली ओषधे लिहून देतात. रुग्णालयाच्या बाहेर असलेल्या मेडिकल दुकानदारांशी वायसीएममधील डॉक्टरांचे संगनमत झाले असून, रुग्णांची पिळवणूक करून महिन्याला लाखो रुपये कमावत आहेत.

वायसीएम रुग्णालयातील एक्स-रे, सोनोग्राफी विभाग व इतर लॅबमध्ये तपासण्यांसाठी येणाऱ्या रुग्णांना मानसिक त्रास दिला जातो. अनेकदा रुग्णांना बाहेरच तपासण्या करण्यास सांगितले जाते. आयसीयूमध्ये वशिल्याशिवाय रुग्णाला दाखलच करून घेतले जात नाही. ह्दयाशी संबंधित आजारावर उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात उभारण्यात आलेले रूबी अलकेअर म्हणजे लुटीचे दुकानच आहे. रुग्णालयात सुरू असलेल्या या सर्व गैरप्रकारांची अधीक्षक डॉ. पवन साळवे यांना पूर्ण कल्पना आहे. त्याबाबत त्यांच्याकडे अनेकदा तक्रार देखील करण्यात आली आहे. परंतु, ते या सर्व गोष्टींकडे जाणूनबूजून दुर्लक्ष करत असून, रुग्णसेवेच्या नावाखाली होणाऱ्या या लुटमारीत डॉ. पवन साळवे हेदेखील सामील आहेत. त्यामुळे डॉ. पवन साळवे यांच्यासह अन्य जबाबदार डॉक्टरांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.”