Chinchwad

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून आदिवासी संस्कृती जिवंत ठेवण्याचे काम – आमदार जगताप

By PCB Author

November 24, 2018

चिंचवड, दि. २४ (पीसीबी) – आदिवासी संस्कृती जिवंत ठेवण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महापालिकेने आदिवासी संगीत, संस्कृती व खाद्यदर्शन महोत्सवाचे आयोजन केले आहे. अशा महोत्सवामुळे आदिवासी संस्कृतीतील चांगल्या गोष्टी इतर समाजाला देण्यास मदत होईल, असे मत भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी शनिवारी (दि. २४) व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मागासवर्गीय कल्याणकारी योजनेअंतर्गत पिंपळेगुरव येथील सृष्टी चौकाजवळ २३ नोव्हेंबर २५ नोव्हेंबर दरम्यान आदिवासी संगीत/संस्कृती व खाद्यदर्शन- २०१८ या महोत्सवाचे आयोजन करण्यातआले. त्याचा उद्घाटन आमदार जगताप यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आदिवासी समाजातील आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.

आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, “गावाकडून खूप आदिवासी लोक शहरात येतात. त्यांना तुमचा आधार वाटतो. असाच तुमचा आधार त्यांनावाटत राहावा आणि आपल्या आदिवासी बांधवांना जास्तीत जास्त कशी मदत करता येईल यासाठी लोकप्रतिधींनी प्रयत्न करावेत. आदीवासींसाठी शासन मोठ्या प्रमाणात योजना राबवित असते. अशा योजना त्यांच्यापर्यंत कशा पोहचविल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. याबाबतची पुस्तिका शासन दरबारी उपलब्ध आहे. शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न झाले तरचखऱ्या अर्थाने समाज पुढे जाईल.”

महोत्सवाची सुरूवात आदिवासी शोभा यात्रेने झाली. त्यानंतर आदिवासी तारपा नृत्य कला सादर करण्यात आली. तूरनाच नृत्य व शिवसह्याद्री ढोल पथकाचे सादरीकरण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक भाऊसाहेब सुपे यांनी केले. सूत्रसंचलन माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले यांनी केले.