Pimpri

पिंपरी चिंचवड महापालिका खरेदी करणार १० हजार रेमडेसिव्हिर

By PCB Author

May 13, 2021

पिंपरी , दि. १३ (पीसीबी) – कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी आवश्‍यक असलेले दहा हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन महापालिका खरेदी करणार आहे. त्यासाठी तीन कोटी दोन लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. महापालिकेची विविध रुग्णालये व जम्बो सेंटरमधील रुग्णांसाठी हे इंजेक्शन दिले जाणार आहेत. त्यासाठीच्या खर्चासह विविध विकास कामांसाठी येणाऱ्या सुमारे ४९ कोटी ३२ लाख रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.

महापालिका स्थायी समितीची बैठक ऑनलाइन झाली. अध्यक्षस्थानी नितीन लांडगे होते. मंजूर कामांमध्ये शिंदे वस्ती रावेत येथील रस्त्याच्या डांबरीकरणासाठी एक कोटी १५ लाख, दिघीतील रस्त्यांसाठी ६१ लाख, प्रभाग सातमधील रस्त्यांसाठी ३१ लाख, आरक्षण २२१ येथे बहुउद्देशीय क्रीडांगण विकसित करण्यासाठी ५३ लाख, मोशी गावठाण, शिवाजीवाडी, लक्ष्मीनगर, आदर्शनगर, गंधर्वनगरी, डुडुळगाव, शास्त्री चौक परिसरात मलनि:सारण कामांसाठी ३० लाख, सेक्टर चारमध्ये विरंगुळा केंद्र व उद्यान उभारण्यासाठी २७ लाख, मोशीतील मोरया कॉलनी, फातिमानगर, खानदेशनगर, संत ज्ञानेश्‍वरनगर मधील रस्त्यांसाठी दोन कोटी २५ लाख, आरोग्य विभागात उपकरणे खरेदीसाठी ४९ लाख, प्रभाग सहामधील भगतवस्ती, गुळवेवस्ती, धावडेवस्ती, चक्रपाणी वसाहतीतील रस्त्यांसाठी ९७ लाख, मासूळकर कॉलनीमधील रस्त्यांसाठी २५ लाख, दापोडीतील रस्त्यांसाठी एक कोटी ७४ लाख, सांगवी येथील पीडब्लूडी मैदानावर उभारायच्या ४०० बेडच्या कोविड रुग्णालयास वीजपुरवठ्यासाठी सुरक्षा ठेव एक कोटी ३१ लाख, चिंचवड गावठाण, गोखले हॉल, गांधी पेठ, पडवळ आळी, भोईर आळीतील पदपथांसाठी २९ लाख, शिवाजी मंडळाच्या मैदानात प्रेक्षक गॅलरी उभारण्यासाठी २८ लाख, दळवीनगर-बिजलीनगर भागातील रस्त्यांसाठी ३३ लाख, वाल्हेकरवाडीतील रस्त्यांसाठी २५ लाख, मामुर्डी स्मशानभूमीसाठी २६ लाख, जिजाऊ पर्यटन केंद्र देखभालीसाठी ५१ लाख, रहाटणीतील जलनि:सारण कामांसाठी ६८ लाख, थेरगाव पवारनगर, पडवळनगर जलनि:सारणासाठी ३९ लाख आदी कामांचा यात समावेश आहे.