पिंपरी-चिंचवड महापालिका; लॅप्रोस्कोपी मशीनच्या निविदेमध्ये ठेकेदारांची रिंग?

0
328

पिंपरी,दि. 25 (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे यशवंतराव चव्हाण (वायसीएम) रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी राखीव करण्यात आल्यानंतरही या ठिकाणच्या प्रसूती विभागासाठी (गायनॅक) तब्बल सहा कोटी खर्च करून चार लॅप्रोस्कोपी मशीन खरेदी करण्याचा डाव आखण्यात आला आहे. यासाठी भाजपाच्याच एका नेत्याने चार ठेकेदारांची रिंग करून त्याच ठेकेदारांना पात्र करण्यासाठी अधिकाऱ्यांना हाताशी धरून प्रयत्न चालविल्यामुळे हा विषय महापालिका पातळीवर चर्चेचा बनला आहे. दरम्यान, विविध खरेदी प्रकरणातील नेते, नगरसेवंकच्या सहभागमुळे सत्ताधारी भाजपा रोज बदनाम होत आहे. दिवसेंदिवस राष्ट्रवादी आक्रमक होत असल्याने भाजपामधे खळबळ आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या “वायसीएम’ रुग्णालयासाठी गेल्या काही दिवसांमध्ये कोट्यवधी रुपयांची साहित्य खरेदी करण्यात आली आहे. काही साहित्य कोरोनाच्या नावाखाली तर काही साहित्य वैद्यकीय विभागात खरेदीला बंदी नसल्याचा फायदा उठवित खरेदी केले आहे. विशेष बाब म्हणजे सध्या “वायसीएम’ रुग्णालयात कोरोना व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याच आजाराचे रुग्ण दाखल करून घेतले जात नाहीत. असे असतानाही इतर सुविधांसाठी लागणाऱ्या साहित्याचीही मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू असल्यामुळे संपूर्ण खरेदी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
महापालिकेने जानेवारी महिन्यात वायसीएमच्या प्रसूती विभागासाठी दोन लॅप्रोस्कोपी मशीन खरेदी करण्यासाठी निविदा राबविली होती. मात्र “अपेक्षित’ ठेकेदार न आल्यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. यानंतर पुन्हा अचानक 14 फेब्रुवारीला पुनर्निविदा काढण्यात आली. 30 एप्रिल ही अंतिम तारीख असतानाही ठराविक ठेकेदारालाच काम मिळावे यासाठी निविदेमधील अटी व शर्ती बदलून या निविदेला 30 मेपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली. दीड कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या निविदा प्रक्रियेच्या अटी व शर्ती बदलावयाच्या असल्यास “प्री बिड’ मिटिंग घेणे बंधनकारक आहे. मात्र या अटीला वाटाण्याच्या अक्षता लावत अटी व शर्ती बदलण्यात आल्या. आयुक्तांच्या डोळ्यादेखत सुरू असलेली ही लूट थांबविण्यासाठी लक्ष घालतील का? असा प्रश्‍न सर्वसामान्यांमधून विचारण्यात येत आहे.

खरेदीचा अट्टाहास का?
सध्या “वायसीएम’ कोरोनासाठी राखीव आहे. या ठिकाणी एकही रुग्ण इतर आजारांचा दाखल केला जात नाही. प्रसूतीसाठीदेखील महिलांना दाखल करून घेतले जात नाही. कोरोना आणखी किती काळ असणार याबाबत कोणतीच माहिती नाही. असे असतानाही तब्बल सहा कोटी रुपयांच्या लॅप्रोस्कोपी मशीन खरेदी करण्याचा अट्टाहास का चालविला जात आहे? असा प्रश्‍न विचारला जात आहे. केवळ ठेकेदार आणि सत्ताधारी पोसण्यासाठी अधिकाऱ्यांना हाताशी धरून सर्वसामान्य नागरिकांच्या पैशांची लूट बिनदिक्कतपणे सुरू असल्याचा आरोप होत आहे.

नगरसेविका सुलक्षणा शीलवंत यांनी घेतला आक्षेप –
राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुलक्षणा शीलवंत यांनी या निविदा प्रक्रियेला आक्षेप घेत आयुक्तांना ही निविदा रद्द करण्याची मागणी केली आहे. “वायसीएम’मध्ये प्रसूती कक्ष सुरू होत नाही तोपर्यंत ही खरेदी करू नये, अशी मागणी केली आहे. यावर्षी महापालिकेचे उत्पन्न घटणार असून सहा कोटींची उधळपट्टी हा नागरिकांच्या डोळ्यांत धूळ फेकण्याचा प्रकार असून, ही निविदा प्रक्रिया राबविण्याचा अट्टाहास कायम ठेवल्यास न्यायालयात दावा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

भाजपा नेत्याची मध्यस्थी –
लॅप्रोस्कोपी मशीन खरेदी करण्यासाठी प्रशासनाकडे अट्टाहास धरत चार ठेकेदारांना रिंग करून या निविदेत सहभागी होण्यासाठी भाजपाचा एक नेता मध्यस्थी करत असल्याचे समोर आले आहे. या नेत्याने चार ठेकेदारांशी चर्चा करून त्यांना निविदेत सहभागी होण्याची सूचना केली आहे. विशेष म्हणजे प्रत्येकाने एकच मशीन पुरविण्याबाबतही सूचविले असून, चार ठेकेदार रिंग करून दर टाकतील. यातील एकाच्या नावावर कंत्राट घेतले जाणार असून उर्वरित तिघेजण प्रत्येकी एका मशीनसाठी पैसे गुंतवतील. निविदेत दर काय टाकायचे, इतरांना सहभागी न होऊ देण्यासाठीचेही नियोजन करण्यात आल्याचे समजते.