पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे विलास मडिगेरी

0
668

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे अधिकृत उमेदवार विलास मडिगेरी यांची गुरूवारी (दि. ७) निवड झाली. भाजपचे बंडखोर उमेदवार शीतल शिंदे यांनी माघार घेतली. परंतु, राष्ट्रवादीच्या मयूर कलाटे यांनी माघार न घेतल्याने सभापतीपदासाठी निवडणूक झाली. त्यामध्ये भाजपच्या मडिगेरी यांना १२ मते, तर कलाटे यांनी ४ मते मिळाली. त्यामुळे मडिगेरी हे आठ मतांनी विजयी झाले.

महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने पक्षाने स्थायी समिती सभापतीपदासाठी विलास मडिगेरी यांचा उमेदवारी अर्ज भरला होता. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून सभापतीपदासाठी इच्छुक असलेल्या भाजपच्याच शीतल शिंदे यांनीही आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मदतीने उमेदवारी अर्ज भरला होता. भाजपने स्थायी समितीत निवड झालेल्या पक्षाच्या नगरसेवकांना एकच वर्ष संधी देण्याचे धोरण ठरवले होते. परंतु, गेल्या वर्षीही स्थायी समितीचे सदस्य असलेल्या विलास मडिगेरी यांना दुसऱ्या वर्षी समितीचे सभापतीपद देण्याचा निर्णय पक्षाने घेतला. त्यामुळे दुखावलेल्या शीतल शिंदे यांनी बंडखोरी करत सभापतीपदासाठी अर्ज भरला होता. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीकडून मयूर कलाटे यांनी अर्ज सादर केला होता.

या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या मुख्य इमारतीत स्थायी समिती सभापतीपदासाठी दुपारी बारा वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सभापतीपदासाठी आलेल्या सर्व अर्जांची छाननी केली. त्यानंतर उमेदवारांना अर्ज माघारीसाठी १५ मिनिटांची मुदत देण्यात आली. या मुदतीत भाजपचे बंडखोर उमेदवार शीतल शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. परंतु राष्ट्रवादीच्या मयूर कलाटे यांनी अर्ज मागे न घेतल्याने सभापतीपदासाठी निवडणूक झाली. त्यामध्ये मडिगेरी यांना भाजपची दहा, अपक्ष आणि शिवसेनेचे प्रत्येकी एक अशी १२ मते पडली. मयूर कलाटे यांना राष्ट्रवादीची ४ मते मिळाली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी सूरज मांढरे यांनी स्थायी समिती सभापतीपदी विलास मडिगेरी ८ मतांनी विजयी झाल्याचे जाहीर केले.