पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांची बदली होणार ?

0
371

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – शहरातील कायदा सुव्यवस्थेबद्दल तक्रारींत वाढ झाल्याने पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांची उचलबांगडी होणार असल्याची पोलीस दलात जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शहरात सुरू असलेल्या अवैद्य धंद्यांविषयी निवेदन दिले होते. यानंतर शहरात बिष्णोईंच्या बदलीची चर्चा सुरु झाली आहे. शहरात मटका, दारु अड्डे, वेश्याव्यवसाय कुठे किती याची जंत्रीच आमदार बनसोडे यांनी दिली होती.

सप्टेंबर २०१९ रोजी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारला होता. त्यानंतर गुन्हेगारी आटोक्यात येईल अस वाटलं होतं. परंतु, तसे काही झाल्याचे निदर्शनास आले नाही. शहरात वाहन तोडफोड, खून, दरोडा, एटीएम फोडणाऱ्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. मध्यंतरी टोळी वर्चस्वातून एका चा खून झाल्याची घटना देखील घडली होती. दरम्यान, मे महिन्यात ११ खुनाच्या घटनांनी शहराच्या कायदा सुव्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. वाहनचोरीच्या घटनाही रोज दोन-तीन असतात. त्यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल संतापाची भावना आहे.

कोरोना च्या संकटात पोलीस आयुक्तांचे कौतुक ही झाले. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरात अवैद्य धंदे, मसाज पार्लर च्या नावाखाली वेश्या व्यवसाय सर्रास सुरू असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी उघड करत थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देत पोलीस आयुक्तालयात होत असलेल्या भ्रष्टाचारावर बोट ठेवले होते. कोरोनाचा संकटात सोशल डिस्टसिंग, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये असे अनेकदा प्रशासनाने बजावले आहे. परंतु, तसे न होता अवैद्य धंदे सुरू असल्याने कोरोना चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता आमदारांनी थेट उपमुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. त्यामुळे आगामी काळात पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांची उचलबांगडी झालीच तर नवल वाटायला नको.