राज्य मंत्रिमंडळाच्या आज (मंगळवार) झालेल्या बैठकीत पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र पोलिस आयुक्तालय निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.  

यावेळी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय निर्माण करण्यासह त्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली. २ हजार ६३३ नवीन पदे निर्माण केली जाणार आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील ५ पोलिस स्थानके आणि पुणे शहरातील ९ पोलिस स्थानकांचा समावेश केला जाणार आहे. मुख्यालयासाठी तात्पुरती जागा भाड्याने घेतली जाणार आहे.

अनेक दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहराला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय होण्याची मागणी सर्व स्तरातून होत होती. आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांनी शासन दरबारी याबाबत सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता. दरम्यान, शासन स्तरावर स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. आयुक्तालय सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून शहरात जागेची पाहणीसुद्धा करण्यात आली होती.

स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा कारभार चार झोनमध्ये विभागला जाणार आहे. पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त यांच्यासह चार झोनसाठी दोन पोलीस उपायुक्त ही पदे निश्चित करण्यात आली आहेत. चार झोनची जबाबदारी दोन पोलीस उपायुक्तांवर सोपवली जाणार आहे.

तसेच पुणे ग्रामीणला जोडलेला देहूरोड, तळेगाव, आळंदी, दिघी, चाकण हा भाग भौगोलिकदृष्ट्या विचार करता नव्या पोलीस आयुक्तालयाला जोडला जाणार आहे.  त्यासंबंधीचा प्रस्तावही सरकारला देण्यात आलेला आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या खडकी आणि चतु:शृंगी अंतर्गतचा हिंजवडी, वाकड ठाण्याची हद्दही स्वतंत्र आयुक्तालयाच्या चार झोनला जोडली जाणार आहे. आयुक्तालयाची शहर व लगतचा काही ग्रामीण भाग अशी मिळून विस्तारित हद्द होणार आहे.

स्वतंत्र पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलीस उपायुक्तालयाचे चार झोन असतील. दोन पोलीस उपायुक्तांकडे चार विभागाचा कारभार सोपविला जाईल. शिवाय प्रत्येक झोनला सहायक पोलीस आयुक्त असेल. गुन्हे शाखा, उपायुक्त प्रशासन विभाग, वाहतूक शाखा उपायुक्त असे अधिकारी कक्ष सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.