पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत रस्त्याच्या विरुध्द दिशेने वाहन चालवणाऱ्या ८५ जणांवर धडक कारवाई

1060

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – रस्त्याच्या विरुध्द दिशेने वाहन चालवून स्वत: सह इतरांच्या जिवाला धोका निर्माण करणाऱ्या वाहन धारकांना चाप बसावी म्हणून पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत फक्त रस्त्याच्या विरुध्द दिशेने वाहन चालवणाऱ्या एकूण ८५ वाहन धारकांवर पाच दिवसात कलम २७९ प्रमाणे कारवाई करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड आयुक्तालय हद्दीतील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित रहावी म्हणून पोलिसांनी सर्व प्रथम विरुध्द दिशेने वाहन चालवणाऱ्या वाहन धारकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. याप्रकरणी सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पोस्टर लावून नागरिकांची वाहतूकीबाबत जनजागृती करण्यास येत आहे. तसेच सार्वजनिक वाहतूक वाहन चालकांची देखील जनजागृती करण्यात येत आहे.

उपायुक्त विनायक ढाकणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत शनिवार (दि.१५) पासून फक्त रस्त्याच्या विरुध्द दिशेने वाहन चालवून स्वत: सह इतरांच्या जिवाला धोका निर्माण करणाऱ्या वाहन धारकांवर कलम २७९ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये पिंपरी पोलिस ठाणे हद्दीत १७, चिंचवड १, भोसरी १३, भोसरी एमआयडीसी ३, निगडी ७, चाकण १, दिघी ५, आळंदी ४, वाकड २३, हिंजवडी ४, सांगवी ६ आणि देहुरोडमध्ये १ असे एकूण ८५ वाहन धारकांवर कारवाई करण्यात आली आहे. यापुढे देखील ही कारवाई सुरुच राहणार असल्याची माहिती ढाकणे यांनी पीसीबीशी बोलताना दिली.