Banner News

पिंपरी-चिंचवड दर्शन बससेवेचे रामदास आठवलेंच्या हस्ते लोकार्पण

By PCB Author

August 03, 2019

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – दीर्घकाळानंतर शहरात पिंपरी-चिंचवड दर्शन बस सेवा आजपासून (शनिवार) सुरू झाली. या बस सेवेचे लोकार्पण केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते निगडी येथून करण्यात आले.  

याप्रसंगी राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर, महापौर राहुल जाधव, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या नगरसेवक, पदाधिकारी आदी उपस्थित होते.

अण्णाभाऊ साठे बस टर्मिनल, भक्ती-शक्ती चौक, निगडी येथून पहिली बस सोडण्यात येणार आहे. निगडी आणि भोसरी या दोन ठिकाणांहून ही बस सोडण्यात येणार आहे.

निगडीतून सकाळी ९ वाजता ही बस सुटणार आहे. आकुर्डी प्राधिकरण रावेत येथील इस्कॉन मंदिर, चिंचवडचे मोरया गोसावी मंदिर, मंगलमूर्ती वाडा, क्रांतिवीर चापेकर वाडा, सायन्स पार्क, बर्ड व्हॅली, देहूतील गाथा मंदिर, विठ्ठल रूक्मिणी मंदिर, अप्पूघर, दुर्गादेवी टेकडी, भक्ती-शक्ती समूह शिल्प, आदी पर्यटनस्थळांची सैर घडवून आणली जाणार आहे. तर भोसरीतून सुटणारी बस लांडेवाडीतील शिवसृष्टी, आळंदीतील माऊली समाधी मंदिर दर्शन घडविले जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड दर्शन बससाठी एकूण ५७ किलोमीटरचे अंतर असणार आहे. या वातानुकुलीत बससाठी प्रती व्यक्तीसाठी ५०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.