Banner News

पिंपरी चिंचवड ‘कंटेनमेंन्ट झोन’ म्हणून घोषित ; शहरातील सर्व सीमा बंद !

By PCB Author

April 20, 2020

पिंपरी, दि.२० (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली असून थबरदारीचा उपाय म्हणून पिंपरी चिंचवड शहर ‘कंटेनमेंन्ट झोन’ घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार काल रविवार (दि.१९) पासून सोमवार (दि.२७) एप्रिलपर्यंत शहराच्या सर्व सीमा बंद करण्याचे आदेश पालिका आयुक्त श्रावण हार्डिकर यांनी दिले आहेत.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये मागील काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तसेच शेजारील पुणे शहरात देखील रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात स्थानिक प्रसार स्टेज न रहाता सामुदायिक प्रसार सुरू होण्याची शक्यता असल्याने कोरोनाचा वेगाने होणारा प्रसार रोखण्यासाठी शहरातील नागरिकांच्या हालचालीवर तसेच बाहेर फिरण्यावर मर्यादा आणण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील संपुर्ण भाग रविवार (दि.१९) रात्री १२ वाजता ‘कंटेनमेंन्ट झोन’ म्हणून आयुक्त श्रावण हार्डिकर यांनी घोषित केले आहे. त्यामुळे शहरामध्ये येणारे सर्व प्रमुख रस्ते बंद करण्यात आले आहे. त्यानुसार संबधीत पोलिस प्रमुख हे या भागाच्या हद्दी सील करतील हे आदेश २७ एप्रिल २०२० पर्यंत लागू राहाणार आहेत.