‘पिंपरी-चिंचवडसह राज्यभरातील सर्वच मॉलमध्ये छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करा’ – अनुप मोरे

0
323

मॉल व्यवस्थापकांनो निवेदनाची दखल घ्या…

पिंपरी, दि.२८ (पीसीबी) – पुरोगामी विचाराची कास धरून रयतेचे स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जवळ आली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक आस्थापनेमध्ये महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. ग्राहकांची बाजारपेठ असणाऱ्या महाराष्ट्र राज्यासह, पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच मॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे यांनी केली आहे.

यासंदर्भात अनुप मोरे यांनी मॉल व्यवस्थापकांना रितसर निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम भारतीयांचे तरुण सुवकांचे प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांनी संपूर्ण हिंदुस्थानला पछाडलेल्या मुगल साम्राज्याचा अस्त करून स्वराज्याची स्थापना केली. पुरोगामी विचाराची मुहूर्तमेड रोऊन रयतेचे राज्य निर्माण केले. प्रत्येक जाती-धर्मातील व्यक्तीला प्रतिष्ठा आणि अधिकार त्यांनी बहाल केले. अशा महान राजाची जयंती १९ फेब्रुवारी रोजी साजरी होत आहे.

महाराजांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्याची परंपरा आहे. शाळा, कॉलेज, महाविद्यालये, शासकीय व निमशासकीय तसेच खासगी आस्थापनां मध्ये देखील महाराजांची जयंती साजरी केली जाते. आपल्या देशात सर्व जाती-धर्मातील सण उत्साहात साजरे केले जातात. मॉल ही वस्तू विक्रीची बाजारपेठ मानली जाते. याठिकाणी येणा-या प्रत्येक ग्राहकाच्या तरुण युवकाच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांप्रती प्रेम आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरासह राज्यभरातील मॉलमध्ये सर्व शिवप्रेमींनी महाराजांची प्रतिकृती ठेवून त्याचे पुजन करुन शिवजयंती साजरी करावी, अशी मागणी मोरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.