Banner News

पिंपरी-चिंचवडसह राज्यभरात विधानसभेच्या मतदानाला सुरूवात

By PCB Author

October 21, 2019

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी आणि  सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतदानाला आज (सोमवार) सकाळी पासून सुरुवात झाली. सकाळपासून ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता लक्षात घेता मतदारांनी सकाळीच मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करण्यासाठी गर्दी केली आहे.  

पावसामुळे निवडणूक यंत्रणांची रविवारी दिवसभर चांगलीच तारांबळ उडाली.  राज्यातील ३ हजार २३७ उमेदवारांचे भवितव्य आज  ईव्हीएम मशीन मध्ये बंद होणार  आहे. राज्य विधानसभेच्या २८८ जागा तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार. राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत.  मतदान  शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणांनी सर्व  सज्जता ठेवली आहे. सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

राज्यात ९५,४७३ मुख्य तर १,१८८ सहाय्यक अशी एकूण ९६ हजार ६६१ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. चार कोटी ६८ लाख ७५ हजार, ७५० पुरुष तर चार कोटी २८ लाख ४३ हजार ६३५ असे एकूण आठ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यावेळी दोन हजार ६३४ तृतीयपंथी, तीन लाख ९६ हजार अपंग आणि एक लाख १७ हजार ५८१सव्‍‌र्हिस मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.