पिंपरी-चिंचवडला गुरूवारी सायंकाळी पाणीपुरवठा होणार नाही

0
493

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – निगडी, सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रात तसेच रावेत येथील पंपिंग स्टेशनमध्ये तातडीची दुरूस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे गुरूवारी (दि. २८) सायंकाळी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.

सेक्टर क्रमांक २३ मध्ये महापालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. तसेच रावेत येथे पवना नदीच्या बंधाऱ्याजवळ पंपिंग स्टेशन आहे. त्याद्वारे पाणी उचलून ते सेक्टर क्रमांक २३ येथे जलशुद्धीकरणासाठी आणले जाते. त्यानंतर ते संपूर्ण शहराला पिण्यासाठी पुरविले जाते. जलशुद्धीकरण केंद्र आणि पंपिंग स्टेशनमध्ये नियमित दुरूस्तीची कामे करावी लागतात. त्यानुसार गुरुवारी सकाळी या दोन्ही ठिकाणी दुरूस्तीची कामे केली जाणार आहेत.

त्यामुळे गुरूवारी सकाळी शहराला नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे. परंतु, सायंकाळी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाणीपुरवठ्याची सर्व यंत्रणा बंद ठेवण्यात येणार असल्यामुळे सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. त्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि. २९) सकाळी कमी दाबाने आणि अनियमित पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून त्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.