पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकांनीही जनतेच्या पैशांवर दरोडा टाकला; सचिन साठे यांचा घणाघात

0
1557

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच परदेश दौऱ्यात महापौर, आयुक्तांबरोबर विरोधी पक्षनेत्यासह गटनेते देखील सहभागी झाले आहेत. बार्सिलोना येथे आयोजित केलेले स्मार्ट सिटी चर्चासत्र संपून चार दिवस झाले तरी अद्याप शिष्टमंडळातील सर्व प्रतिनिधी शहरात आलेले नाहीत. महापालिकेच्या खर्चाने होणारे असले खर्चिक परदेश दौरे म्हणजे नागरिकांच्या पैशावर टाकलेला सामूहिक दरोडाच आहे. या दौऱ्यातून काय निष्पन्न झाले याचा सविस्तर अहवाल महापौर, विरोधी पक्षनेते, सहभागी गटनेते, आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांनी जनतेसमोर मांडावा, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली आहे.

सचिन साठे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, “महापालिकेचे २१ लाख रुपये खर्च करुन बार्सिलोना येथे आयोजित केलेल्या स्मार्ट सिटीच्या चर्चासत्रासाठी महापौर राहुल जाधव, विरोधी पक्षनेते दत्ता साने, पक्षनेते एकनाथ पवार, गटनेते सचिन चिखले, प्रमोद कुटे, सह शहर अभियंता राजन पाटील, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांच्यासह दहा प्रतिनिधींचे शिष्टमंडळ गेले होते. चर्चासत्र संपून चार दिवस झाले तरी अद्यापही शिष्टमंडळाचे सर्व प्रतिनिधी शहरात परत आलेले नाहीत. वास्तविक विरोधी पक्षांनी व इतर गटनेत्यांनी शहरातील नागरीकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर सभागृहात आवाज उठविला पाहिजे. सत्ताधारी पक्ष बहुमताच्या जोरावर अनावश्यक खर्चिक प्रकल्पांवर जनतेच्या पैशाची लूटमार करीत असते. त्याला विरोधी पक्षांनी तीव्र विरोध करुन अशी चुकीची कामे थांबविण्यासाठी सत्ताधाऱ्यांना भाग पाडले पाहिजे.

परंतु, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांबरोबर परदेश दौऱ्यात सहभागी झाल्यामुळे विरोधकांबाबत नागरिकांचा अपेक्षाभंग झाला आहे. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून अवघ्या दिड वर्षांत पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या खर्चाने देश परदेशात १६ दौरे करुन पर्यटनाचा आनंद उपभोगला. यापैकी एकाही दौऱ्याचा अहवाल सभागृहात मांडलेला नाही. बार्सिलोना दौऱ्यातील अहवाल आणि यापुढे मनपाचे लोकप्रतिनिधी व अधिकारी नागरीकांच्या पैशाने देश परदेशात दौऱ्यावर गेले, तर त्या दौऱ्याची फलनिष्पत्ती काय झाली याचा सविस्तर अहवाल जनतेसमोर मांडावा अशी मागणी त्यांनी केली आहे.”