पिंपरी-चिंचवडमध्ये वाहनचोरीच्या घटनात वाढ; सामान्य नागरिकांच्या डोक्याला मनस्ताप

0
222

पिंपरी, दि.23 (पीसीबी) : चाकण येथील श्रद्धा हॉस्पिटलच्या पार्किंग मधून अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. त्यासोबतच पिंपरी-चिंचवड शहरात सहा वाहनचोरीचे प्रकार उघडकीस आले आहेत. याबाबत मंगळवारी (दि. 22) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यासोबतच एका कारचा सायलेंसर चोरुन नेल्याचाही चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाकण पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे तीन गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये तिन्ही दुचाकींचा समावेश आहे. त्यातील एक दुचाकी हॉस्पिटलच्या पार्किंगमधून तर दुसरा प्रकार मेदनकरवाडी येथे घडला. चाकण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वाहनचोरीचा तिसरा प्रकार कुरळी मधील भोसले ट्रान्सपोर्ट कंपनीच्या पाठीमागे घडला. या तिन्ही प्रकारात 80 हजारांची वाहने चोरीला गेली आहेत.

चाकण परिसरातील नाणेकरवाडी येथे चोरट्यांनी कारचा वीस हजारांचा सायलेन्सर चोरून नेला. ही घटना 18 जून रोजी उघडकीस आली आहे.

वाकड पोलीस ठाण्यात एक दहा हजारांची तर दुसरी 60 हजारांची दुचाकी चोरीला गेल्याबाबत दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चिखली पोलीस ठाण्यात देखील 40 हजारांची एक दुचाकी चोरीला गेल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वरील सात प्रकरणात चोरट्यांनी दोन लाख दहा हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.