पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीत उरला नाही दम; पक्षाच्या पुढाऱ्यांना चमकोगिरी आणि प्रसिद्धीचा हव्यास

0
1780

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता नवीन नौटंकी सुरू झाली आहे. महापालिकेच्या सभागृहात बोलू दिले जात नाही म्हणून स्वतःचा स्पीकर आणि माईक लावण्याची परवानगी राष्ट्रवादीने आयुक्तांकडे मागितली आहे. आतापर्यंत सभागृहात अभ्यासूपणे मुद्दे मांडण्यात अपयश आलेल्या राष्ट्रवादीने मीडियाने दखल घ्यावी आणि मोठमोठ्या बातम्या छापून याव्यात यासाठी केलेली ही राजकीय खेळी मानली जात आहे. विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यापासून दत्ता साने यांनी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरण्यास सुरूवात केली आहे. त्यातून भरपूर प्रसिद्धी मिळत असली, तरी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या कामांना वेसण घालण्याचा दम राष्ट्रवादीमध्ये नाही का?, असा प्रश्न शहरातील जनता उपस्थित करत आहे.

राष्ट्रवादीने दहा वर्षांहून अधिक काळ महापालिकेतील सत्ता उपभोगली आहे. त्यामुळे महापालिकेतील कोपरा न कोपरा राष्ट्रवादीला माहिती आहे. पैसा कोठून येतो आणि कोठे जिरतो, याची राष्ट्रवादीला पुरेपूर कल्पना आहे. महापालिकेतील पैशाच्या जोरावरच राष्ट्रवादीच्या अनेकांनी आपल्या सात पिढ्यांसाठी बक्कळ कमाई करून ठेवली आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांपासून ते महापालिकेचा कारभार सांभाळलेल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. अशातच सव्वा वर्षापूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत शहरातील मतदारांनी राष्ट्रवादीची महापालिकेतील सत्ता काढून घेतली आणि विरोधी पक्षात बसविले. त्यामुळे गेल्या वर्षभरात राष्ट्रवादीचे पदाधिकारी सैरभैर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

महापालिकेच्या सभागृहात सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्यासाठी राष्ट्रवादीने जंग जंग पछाडले. माजी विरोधी पक्षनेते योगेश बहल आणि माजी महापौर मंगला कदम यांनी सभागृहात राष्ट्रवादीच्या बाजूने एकहाती किल्ला लढविला. परंतु, आरोपांच्या पलीकडे जाऊन राष्ट्रवादीला ठोस मुद्दे मांडता आले नाहीत. सभागृहात क्षुल्लक कारणावरूनही गोंधळ घालून महापौर नितीन काळजे यांना गोंधळात टाकण्यात मात्र बहल व कदम यशस्वी झाले. विरोधकांच्या गोंधळामुळे गोंधळणारे महापौर काळजे यांच्याकडून घडणाऱ्या चुकांमुळे राष्ट्रवादीला भरपूर प्रसिद्धी मिळत गेली. अशाही परिस्थितीत स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी राष्ट्रवादीचा प्रत्येक हल्ला तितक्याच ताकदीने आणि अभ्यासूपणाने परतवून लावत सत्ताधारी भाजपवर कोणतीही नामुष्की येऊ दिली नाही.

विरोधी पक्षाचे काम करणाऱ्या राष्ट्रवादीला सभागृहात अजूनही सूर गवसलेला नाही. कोणत्याही विषयावर बोलताना राष्ट्रवादीचे नगरसेवक अभ्यासूपणे बोलतात, असे चित्र पाहायला मिळत नाही. सभागृहात मुद्द्याला धरून बोलण्याऐवजी केवळ भाजपवरील रागापोटी बेछूट आरोप करणे एवढाच उद्योग राष्ट्रवादीकडून सुरू असल्याचे पाहायला मिळते. भाजपला सत्तेत येण्याचा अधिकारच नाही आणि हा अधिकार केवळ आमचाच आहे, अशाच अविर्भावात राष्ट्रवादीचे नगरसेवक सभागृहात मुद्दे मांडताना दिसतात. त्यामुळे गेल्या सव्वा वर्षात विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला सत्ताधारी भाजपला आणि प्रशासनालाही कोंडीत पकडण्यात यश आलेले नाही. काहीही करून प्रसिद्धी मिळवायची, एवढाच उद्योग राष्ट्रवादीकडून सुरू आहे.

आता या प्रसिद्धीसाठी राष्ट्रवादीने नवी नौटंकी शोधून काढली आहे. सत्ताधारी भाजप सभागृहात बोलू देत नाही म्हणून स्वतःचा माईक आणि स्वीकर लावण्याची परवानगी राष्ट्रवादीने मागितली आहे. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची ही आयडियाची कल्पना आहे. सभा कामकाज कसे चालवावे, याचे नियम आहेत. ते पायदळी तुडवून कोणत्याही मुद्द्यावर सभागृहात बोलता येत नाही. मुद्दा सोडून बोलणाऱ्यांना न बोलू देण्याचा महापौरांचा अधिकार आहे. या अधिकारावरच गदा आणण्याचा राष्ट्रवादीचा हा प्रयत्न दिसत आहे. सत्ताधारी भाजपकडून चुकीचे काम सुरू आहे, याचा एकही पुरावा राष्ट्रवादीला आतापर्यंत सादर करता आलेला नाही.

पत्रकार परिषदा घ्यायच्या. त्यात केवळ बेछूट आरोप करत चमकोगिरी करायची आणि प्रसिद्धी मिळवून स्वतःसोबतच पक्षाचेही अस्तित्व जिवंत ठेवायचे, असाच प्रयत्न राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून सुरू आहे. त्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरल्या जात आहेत. महापालिकेच्या सभागृहात स्वतःचा स्पीकर आणि माईक वापरण्याची परवानगी मागणे, हा त्यातलाच एक प्रकार मानला जात आहे. त्यातून राष्ट्रवादीला भरपूर प्रसिद्धी मिळत असली, तरी महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या चुकीच्या कामांना पुराव्यासह वेसण घालण्याचा दम राष्ट्रवादीमध्ये नाही का?, असा प्रश्न शहरातील जनता उपस्थित करत आहे.