पिंपरी-चिंचवडमध्ये ‘महाराष्ट्र बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
867

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज (गुरूवार) क्रांतीदिनी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर शहर परिसरात बंद पाळून मराठा आंदोलकांनी शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली काढली. व्यापारी वर्गाने दुकाने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग नोंदवला. सकाळपासूनच रस्त्यावर तुरळक वाहतूक सुरू होती. नेहमी गजबजलेल्या चौका-चौकामध्ये शुकशुकाट जाणवत होता. बाजारपेठांही बंद ठेवण्यात आल्या होत्या. काही मार्गावरील पीएमपी बस वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. तर शहराच्या काही भागात अंशत: बस सुरू होत्या. रिक्षा वाहतूकही बंद असल्याने चौकातील रिक्षा थांबे ओस पडले होते.

पिंपरीतील बाबासाहेब आंबेडकर चौकात पिंपरी-चिंचवड सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ठिय्या आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली. पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी सकाळीपासून चौकात पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. भोसरी, निगडी, आकुर्डी, हिंजवडी, वाकड, काळेवाडी, रावेत, किवळे देहूरोड या परिसरातही बंदला चांगला प्रतिसाद लाभला. दुकाने, बाजारपेठा बंद ठेवून व्यापाऱ्यांनी बंद यशस्वी केला. काही ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आले. तर मराठा आंदोलकांनी दुचाकीवरून रॅली काढून बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने शहरातील शाळा, महाविद्यालये, ,सरकारी कार्यालयांना आज सुट्टी जाहीर केली होती. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात शुकशुकाट जाणवत होता. भोसरी, पिंपरी, चिंचवड येथील एमआयडीसी बंद ठेवण्यात आल्याने यंत्रांचा आवाज येत नव्हता. हिंजवडीतील बहुतांश आयटी कंपन्यांना सुट्टी दिली होती. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी जाणवली नाही. दरम्यान अत्यावश्यक सेवांना बंदमधून सुट दिल्याने शहरातील रूग्णालये, औषधे दुकाने सुरू होती. रूग्णवाहिका सुरू होत्या.