Pimpri

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रथमच मोरया युथ फेस्टिव्हलचे आयोजन; १०० महाविद्यालये सहभागी होणार

By PCB Author

October 06, 2018

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – कर्तव्य फाऊंडेशनच्या वतीने शहरातील युवक युवतींना आपल्यातील कलागुण व विविध कौशल्य सादर करण्यासाठी मोरया युथ फेस्टिव्हलचे पुढील वर्षाच्या सुरूवातीला आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष व राज्य लेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन यांनी दिली.

यावेळी प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, नगरसेवक बाबू नायर, कामगार नेते इरफान सय्यद, जयहिंद हायस्कूलच्या मुख्याध्यापिका ज्योतिका मलकानी, प्रा. शिल्पागौरी गणपुले, उद्योजक चेतन फेंगसे, ज्येष्ठ कलाकार किरण येवलेकर, फोर्ब्स मार्शल कंपनीचे बिझनेस हेड राजेश पाटील आदी उपस्थित होते.

अॅड. पटवर्धन म्हणाले, “या फेस्टिव्हलमध्ये शहरातील शंभरहून जास्त महाविद्यालये सहभागी होतील. युवकांमध्ये शारिरीक, मानसिक बळ वाढविणारा आणि युवा पिढीला व्यसनांपासून दूर राहण्यास प्रोत्साहित करणारा मोरया युथ फेस्टिव्हल शहराचा मानाचा तुरा ठरेल. या फेस्टिव्हल अंतर्गत शहरातील शंभरहून जास्त महाविद्यालयात नृत्य स्पर्धा, कॅरम, बुद्धीबळ, छायाचित्रण, वक्तृत्व, फुटबॉल, हॉकी, कबड्डी, टेबल टेनिस, क्रिकेट, रांगोळी, मेहंदी आणि ऑन द स्पॉट पेंटींग अशा वैयक्तिक व सांघिक स्पर्धा घेण्यात येणार आहेत. प्रत्येक स्पर्धेच्या विजेत्यास समारोप कार्यक्रमात आकर्षक बक्षीसे देऊन गौरविण्यात येईल.

या फेस्टिव्हलअंतर्गत लोगो स्पर्धा घेण्यात येणार आहे. इच्छुकांनी २१ ऑक्टोबरपर्यंत आपले डिझाईन moryayouthfestival@gmail.com या ईमेलवर पाठवावेत. सर्वोत्कृष्ट डिझाईनरला फेस्टिव्हलच्या उद्‌घाटन समारंभात मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात येईल. तसेच युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी स्पर्धा परिक्षेची तयारी, आरोग्याचे महत्व, उद्योग व्यवसायातील संधी, व्यवसाय सुरु करण्यासाठी शासकीय, वित्तीय संस्थांचे मार्गदर्शन, उच्च शिक्षणासाठी देशात व परदेशातील संधी या विषयी सहाय्य व मार्गदर्शन, महिलांचे हक्क, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील संधी अशा विविध विषयांवर ज्येष्ठ मान्यवरांची व्याख्याने व मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.”