Pimpri

पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाची संततधार; पवना नदीच्या पाणीपातळीत वाढ  

By PCB Author

August 21, 2018

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – मावळ परिसरासह पिंपरी-चिंचवड शहरात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. गेल्या आठवडाभर रिमझिम पडणाऱ्या पावसाने सोमवारपासून चांगलाच जोर धरला आहे. आज (मंगळवार) सकाळपासून बरसणाऱ्या पावसाची शहरात दुपारपर्यंत संततधार चालू होती. पावसामुळे शहरातील सखल भागांना तळ्याचे स्वरूप आले आहे.  

पवना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने रावेत बंधारा पाण्याखाली गेला आहे. तसेच थेरगांव येथील केजुबाई बंधाऱ्यावरून ओसंडून पाणी वाहू लागले आहे. काठावरील मंदिरात पाणी शिरले आहे. येथे नदीचा पूर पाहण्यासाठी नागरिकांनी  मोठी गर्दी केली आहे. पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यावर खड्डे पडले आहेत. खड्ड्यातून वाहन चालवताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. तसेच मोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे.

मावळ परिसरातही पावसाची जोरदार रिपरिप सुरू आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात पवना धरण शंभर टक्के भरले आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. परिणामी पवना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पावसाची अशीच संततधार सुरू राहिल्यास धरणातून विसर्ग वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे पवना नदीच्या काठावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मावळ परिसरातील शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त् करण्यात येत आहे. हा पाऊस खरिप पिकांच्या वाढीसाठी अनुकूल असल्याने शेतकरी आनंदीत झाला आहे. भातपीकांसाठी हा पावस पोषक आहे. त्यामुळे भाताची रोपे तरारून आली आहेत.