पिंपरी-चिंचवडमध्ये धुळवड उत्साहात साजरी; तरूणाई रंगात रंगली 

0
805

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – रंग बरसे रे… रंग बरसे, आला होळीचा सण लय भारी चल नाचयू… या गाण्यांच्या ठेक्यावर पिंपरी-चिंचवडमध्ये तरूणाईसह आबालवृध्दांनी होळीचा सण मोठ्या उत्साहात आज (गुरूवार) साजरा केला. बुरा ना मानो होली है’ असे म्हणत एकमेकांना कोरडे नैसर्गिक रंग लावून धुळवड  साजरी करण्यात आली. 

रंगाने माखलेले चेहरे घेऊन युवक-युवतींनी दुचाकींवरून शहरात  फेरफटका मारला. मित्र- मैत्रिणींनी एकमेकांना रंग लावून होळीची आनंद व्दिगुणीत केला.  हुताशिनी पौर्णिमेनंतर पाच दिवसांनी रंगपंचमी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सण  असतो. तोपर्यंत होळीचा माहौल सर्वत्र सुरू असतो.  होळीतील राख अंगाला फासून घेत पारंपरिक पद्धतीने धुळवड खेळली जाते.

बच्चे कंपनीही रंगपंचमी खेळण्यासाठी सकाळपासूनच घराबाहेर पडली होती. विविध प्रकारच्या पिचकाऱ्या, पाण्याचे फुगे घेऊन लहान मुले एकमेकांच्या अंगावर रंगांची बरसात करत होते. सर्वत्र रंगीबेरंगी चित्र दिसत होते. बादल्यांमध्ये रंगाचे पाणी करून चिंब भिजेपर्यंत मुले एकमेकांना रंग लावत होती. नैसर्गिक रंगांचा वापर सगळीकडे दिसून आला. तर काही ठिकाणी तरूणांकडून आईल पेंट, अंडी, केमिकल रंगांचीही वापर करण्यात आल्याचे दिसून आले.

महिलांनी धुळवड मोठ्या उत्साहात साजरी केली. एकमेकींच्या घरात जाऊन नैसर्गिक रंग लावून होळी साजरी करण्यात आली. तत्पूर्वी बुधवारी सायंकाळी होळीचे दहन करण्यात आले. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून प्रसादाचे वाटप करण्यात आले. शहरातील अनेक ठिकाणी असलेल्या मंदिरासमोर मोठी होळी करून दहन करण्यात आले.