पिंपरी-चिंचवडमध्ये दुकानदारांकडून खंडणी उकळणारी टोळी सक्रिय; पोलिसांकडे कारवाईची मागणी

0
570

पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस शेगडी दुरूस्ती व विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना ब्लॅकमेल करून लूट करणारी टोळी सक्रिय असल्याचे समोर आले आहे. छावा या संघटनेच्या नावाखाली ही टोळी अशा दुकानदारांकडून पैसे उकळण्याचे काम करत आहे. काळेवाडीतील एका दुकानदाराला आलेल्या अनुभवानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात शिव व्यापारी सेनेने पालकमंत्री गिरीश बापट आणि पोलिसांकडे तक्रार केली असून, छावा संघटनेच्या नावाचा वापर करून गॅस शेगडी दुरूस्ती व विक्री करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

शहरात गॅस शेगडी दुरूस्ती व विक्रीचा व्यवसाय करणारे अनेक लहान-मोठी दुकाने आहेत. अशा दुकानांमध्ये काही ठराविक किलोपर्यंत गॅसचा साठा करण्याचा परवाना दिला जातो. त्याच्या आधारावर गॅस दुरूस्तीचा व्यवसाय चालतो. परंतु, दुकानदार परवान्यापेक्षा अधिक किलोच्या गॅसचा साठा करत असल्याच्या नावाखाली छावा या संघटनेने दुकानदारांना ब्लॅकमेल करण्याचा धंदा चालविला आहे. या संघटनेचे नाव घेऊन चार-पाच जणांचा समावेश असलेली टोळी गॅस शेगडी दुरूस्ती व विक्री करणाऱ्या संबंधित दुकानांमध्ये जाते. तेथे तुम्ही अवैधपणे व्यवसाय करत असल्याचे सांगून पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करण्याची धमकी देत पैशांची मागणी केली जाते.

बुधवारी (दि. २८) काळेवाडी, तापकीरनगर येथील माऊली गॅस शेगडी दुरूस्ती व विक्री दुकानदाराला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न या टोळीने केला. छावा संघटनेचे असल्याचे सांगून या दुकानदाराकडे पैशांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास अन्नधान्य पुरवठा विभाग तसेच १०० क्रमांकावर फोन करून तक्रार करण्याची धमकी दिली. त्याला दाद न देता संबंधित दुकानदाराने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे या टोळीतील एकाने निगडी पोलिसांना आणि अन्नधान्य पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेतले. अधिकाऱ्यांनी दुकानाची तपासणी केली असता तेथे गॅसचा काळाबाजार होत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर छावा संघटनेच्या टोळीने तेथून पलायन केले.

यासंदर्भात शिव व्यापारी सेनेचे शहरप्रमुख युवराज दाखले यांनी पालकमंत्री गिरीश बापट आणि पोलिसांच्याकडे तक्रार केली आहे. छावा या संघटनेच्या नावाखाली गॅस शेडगी दुरूस्ती व विक्री करणाऱ्या दुकानदारांना ब्लॅकमेल करणाऱ्या संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दाखले यांनी केली आहे.