पिंपरी-चिंचवडमध्ये आज मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर, तर शरद पवारांची सत्ताधाऱ्यांवर तोफ धडाडणार

0
1715

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उद्या (शनिवार) पिंपरी-चिंचवडमध्ये येत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधात, तर शरद पवार यांची भाजप-शिवसेनेच्या विरोधात तोफ धडाडणार आहे. राज्यातील या दोन दिग्गज नेत्यांची पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच दिवशी सभा होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. हे दोन्ही नेते काय बोलतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणूक अवघ्या पाच महिन्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी करून लोकसभा निवडणुकांना सामोरे जाणार आहे. केंद्र आणि राज्याच्या सत्तेत सहभागी असलेली भाजप आणि शिवसेनेत युती होणार की नाही याबाबत अजून तरी स्पष्टता होत नाही. या दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये अद्याप चर्चाही सुरू नाही. त्यामुळे युतीबाबत निवडणुकीच्या शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता राहणार आहे. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपने लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची जोरदार तयारी केली आहे.

लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यासाठी भाजपने पिंपरी-चिंचवड शहराची निवड केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीची पहिली सभा उद्या (शनिवार) पिंपरी-चिंचवडमध्ये होणार आहे. प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदानावर दुपारी तीन वाजता ही सभा होईल. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह मंत्रिमंडळातील भाजपचे अनेक नेते पिंपरी-चिंचवडमध्ये येणार आहेत. शिवसेनेचा खासदार असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या या सभेकडे काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेचेही विशेष लक्ष असणार आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते व आमदार अजितदादा पवार हे देखील उद्या पिंपरी-चिंचवडमध्ये येत आहेत. रहाटणीतील थोपटे लॉन्समध्ये होणाऱ्या कामगार परिषदेत हे दोघेही मार्गदर्शन करणार आहेत. पिंपरी-चिंचवड शहर यापूर्वी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. सध्या शहराच्या राजकारणांवर भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी घट्ट पकड निर्माण केलेली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच दिवशी शरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधात, तर शरद पवार यांची भाजप-शिवसेनेच्या विरोधात तोफ धडाडणार आहे. हे दोन्ही नेते काय बोलतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.