Banner News

पिंपरी-चिंचवडमध्ये आता विधानसभेची तयारी; सप्टेंबरमध्ये आचारसंहिता आणि ऑक्टोबरमध्ये निवडणूक

By PCB Author

May 02, 2019

पिंपरी, दि. २ (भीमराव पवार) – मावळ आणि शिरूर लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसल्यानंतर आता पिंपरी-चिंचवडमध्ये विधानसभेच्या तयारीला वेग येणार आहे. विद्यमान आमदारांनी तर आधीपासूनच निवडणुकीची तयारी ठेवली आहे. आता त्यांना टक्कर देण्यासाठी कोण कोण तयारी सुरू करणार हे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही दिवसांतच स्पष्ट होईल. विधानसभेची मुदत ऑक्टोबर २०१९ मध्ये संपणार आहे. २०१४ मध्ये विधानसभेसाठी १८ सप्टेंबर रोजी निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या होत्या. यंदाही सप्टेंबर महिन्यातच निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील आणि ऑक्टोबर महिन्यात निवडणूक होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी आता जेमतेम तीन-चार महिन्यांचा अवधी शिल्लक राहिला आहे.

मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात २९ एप्रिल रोजी मतदान झाले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसला आहे. आता २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या दोन्ही मतदारसंघात पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश होते. मावळ आणि शिरूरमध्ये कोण जिंकून येणार याबाबत उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात थेट लढत पाहायला मिळाली. त्यामुळे या दोन्ही पक्षांपैकीच एक उमेदवार खासदार होणार हे निश्चित आहे. उमेदवारासोबतच सर्व राजकीय पक्षांचे लोकसभेच्या निकालाकडे लक्ष आहे. लोकसभेचा निकाल काहीही लागला तरी आता पिंपरी-चिंचवडमध्ये विधानसभेच्या तयारीला वेग येणार आहे.

विधानसभेची मुदत ऑक्टोबर २०१९ मध्ये संपणार आहे. २०१४ मध्ये विधानसभेसाठी १८ सप्टेंबर रोजी निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या होत्या. यंदाही सप्टेंबर महिन्यातच निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील आणि ऑक्टोबर महिन्यात निवडणूक होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी आता जेमतेम तीन-चार महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. पिंपरी-चिंचवडमधील तीन विद्यमान आमदारांनी तर लोकसभेच्या निवडणुकीसोबतच विधानसभेच्या निवडणुकीचीही रंगीत तालीम केली आहे. आपापल्या पक्षाच्या व मित्रपक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करताना विद्यमान आमदारांनी विधानसभा निवडणुकीचाही अंदाज घेतला आहे.

कोणीही खासदार झाला तरी विधानसभेला कोणते डावपेच खेळायचे हे सुद्धा विद्यमान आमदारांनी आताच ठरवून ठेवले आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचे लक्ष्मण जगताप, भोसरी विधानसभा मतदारसंघात अपक्ष व भाजपचे सहयोगी महेश लांडगे आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार हे विद्यमान आमदार आहेत. पिंपरी विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या विद्यमान आमदारांना टक्कर देण्यासाठी कोण कोण तयारी सुरू करणार हे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही दिवसांतच स्पष्ट होईल. तसेच लोकसभेप्रमाणेच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा भाजप-शिवसेनेची युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाल्यास कोणाकोणाचे आमदार होण्याचे स्वप्न भंगणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे हे पुन्हा विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांचा एक पाय राष्ट्रवादीच्या दगडावर आहे. आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेल्यास राष्ट्रवादीकडून इच्छुक असणाऱ्या अनेकांचा हिरमोड होणार आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघात शहराच्या राजकारणातील “स्ट्राँग वुमन” आणि स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे या यंदा कोणत्याही परिस्थितीत आमदार होण्यासाठी सज्ज आहेत. त्यांच्या भूमिकेकडे संपूर्ण मतदारसंघाचे आणि शहराच्या राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष असणार आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार अण्णा बनसोडे हे आमदारकीच्या निवडणुकीसाठी आधीपासूनच शड्डू ठोकून तयार आहेत. भोसरी विधानसभा मतदारसंघात माजी आमदार विलास लांडे हे पुन्हा लढतील का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. विरोधी पक्षनेते दत्ता साने हे देखील राष्ट्रवादीकडून लढण्यासाठी तीव्र इच्छुक आहेत.