पिंपरी-चिंचवडमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले; विधानसभेला अन्य पक्षांतील मातब्बर असतील शिवसेनेचे उमेदवार

0
7988

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता असलेल्या अन्य पक्षांतील इच्छुकांना शिवसेनेत घेण्याचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतल्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आणि पक्षातील इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी शहरातील तीनही मतदारसंघात निवडून येऊ शकणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी देण्याशिवाय शिवसेनेपुढे पर्याय नाही. हे नवे चेहरे शिवसेनेकडे उपलब्ध नसल्यामुळे अन्य राजकीय पक्षांतील मातब्बर इच्छुकांना पक्षात घ्यावे लागणार आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत चिंचवड, भोसरी आणि पिंपरी या तीनही विधानसभा मतदारसंघात नवी राजकीय समीकरणे उदयास येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. परिणामी शिवसेनेत वर्षानुवर्षे केवळ खुर्च्या उबवणाऱ्या आणि पत्रके काढून सेटलमेंट करण्यात हयात गेलेल्या पक्ष पदाधिकाऱ्यांना जोराचा धक्का बसल्यास नवल वाटायला नको.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित होण्याच्या शक्यतेने सर्वच पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी जोर-बैठकांवर भर दिला आहे. शिवसेनेच्या नेत्यांचीही मुंबईत नुकतीच बैठक झाली. त्यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता असलेल्या अन्य पक्षांतील इच्छुकांना पक्षाची उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यासाठी पक्षातील निष्ठावंतांची नाराजीचा विचार केला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या निर्णयांमुळे पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेचे धाबे दणाणले आहेत. पक्षप्रमुखांनी या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेसोबतच संपूर्ण शहराचे राजकारण ढवळून निघणार आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये दोन लोकसभा आणि तीन विधानसभा मतदारसंघ येतात. मावळ आणि शिरूर या दोन लोकसभा मतदारसंघांपैकी शिरूर मतदारसंघात विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पुन्हा उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे. परंतु, मावळ मतदारसंघात विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना शिवसेनेची पुन्हा उमेदवारी मिळणार की स्वतः बारणे अन्य पक्षाचा पर्याय निवडणार याबाबत शहराच्या राजकीय वर्तुळात अनिश्चितता व्यक्त होत आहे. असे असले तरी बारणे यांनी पक्षाच्या शहर संघटनेत आपले वर्चस्व ठेवलेले आहे. त्यामुळे ते शिवसेना सोडणार नाहीत, असा कयास आहे. दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेची ही राजकीय स्थिती असताना तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये मात्र पक्षाचा अत्यंत वाईट अवस्था आहे.

शहरात भोसरी, चिंचवड आणि पिंपरी हे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील पिंपरी मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असून, सध्या या मतदारसंघाचा आमदार शिवसेनेचा आहे. अॅड. गौतम चाबुकस्वार हे शिवसेनेचे विद्यमान आमदार पुन्हा एकदा आमदारकी लढवण्याच्या इराद्याने तयारीला लागले आहेत. परंतु, पाच वर्षांत त्यांनी आमदार म्हणून काय काम केले, हा संशोधनाचा विषय होईल. गेली चार वर्षे गायब असलेल्या आमदार चाबुकस्वारांची राजकीय कंजुषी शहराच्या राजकीय वर्तुळात नेहमी चर्चेचा विषय असतो. गेल्यावेळी राष्ट्रवादीच्या सहकार्यामुळे चाबुकस्वार यांना आमदारकीची लॉटरी लागली. परंतु, यंदा तशी परिस्थिती राहिलेली नाही. खासदार बारणे यांनीही पिंपरी मतदारसंघासाठी इतर पक्षातील अन्य इच्छुकांना शिवसेनेत घेऊन चाबुकस्वार यांना राजकीय गॅसवर बसविले आहे. बारणे यांनी पक्षात घेतलेल्यांची आमदारकीला निवडून येण्याची क्षमताच नाही. त्यामुळे पिंपरी विधानसभा मतदारसंघातही शिवसेनेला वेगळा विचार करावा लागेल, अशी राजकीय स्थिती आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या इच्छुकांमध्ये एक-दोन नावे घेता येतील. गटनेते राहुल कलाटे आणि जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे हे दोन पदाधिकारी शिवसेनेकडे चिंचवड मतदारसंघात लढण्यासाठी उपलब्ध आहेत. परंतु, कलाटे यांचे सध्या तळ्यातमळ्यात सुरू आहे. कलाटे आणि खासदार बारणे यांच्यात विस्तवही जात नसल्याचे बोलले जाते. बारणे यांनी कलाटे यांच्यावर वेळोवेळी राजकीय मात केली आहे. त्यामुळे कलाटे यांनी वेगळा विचार केल्यास नवल वाटायला नको. अशा परिस्थितीत शिवसेनेकडे गजानन चिंचवडे हे एकमेव इच्छुक उमेदवार उरतात. चिंचवडे हे खासदार बारणे यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांना नुकतेच जिल्हाप्रमुख करून बारणे यांनी कलाटे यांना इशाराच दिला आहे. परंतु, गजानन चिंचवडे यांच्यातही आमदारकीला निवडून येण्याची क्षमता नसल्यामुळे शिवसेनेला चिंचवड मतदारसंघातही इतर राजकीय पक्षातील मातब्बर उमेदवार गळाला लावावा लागेल.

भोसरी मतदारसंघात शिवसेनेकडे एकही मातब्बर इच्छुक नाही. या मतदारसंघात शिवसेनेकडे लिंबू-टिंबू पदाधिकारी आहेत. हा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघात येतो. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघातील एकाही पदाधिकाऱ्याला आजपर्यंत राजकीय ताकद दिलेली नाही. त्यामुळे शिवसेनेकडे आमदारकीला उमेदवारच नसल्याचे वास्तव आहे. परिणामी अन्य राजकीय पक्षातील उमेदवाराला आयात करण्याशिवाय शिवसेनेपुढे पर्याय नाही. माजी आमदार विलास लांडे आणि विरोधी पक्षनेते दत्ता साने हे भोसरी मतदारसंघात राष्ट्रवादीकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत. या दोघांपैकी एकजण शिवसेनेच्या गळाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अन्य राजकीय पक्षातील इच्छुक उमेदवार आयात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे शहरात नवी राजकीय समीकरणे उदयास येणार आहेत. परिणामी पक्षात केवळ खुर्च्या उबवणारे आणि प्रसिद्धीपत्रके काढून सेटलमेंट करण्यात हयात गेलेल्या पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांना धक्का बसणार आहे.