Pimpri

पिंपरी चिंचवडच्या महापालिका सभागृहातील महापौरांच्या आसना समोरील अडथळा दूर करा, अन्यथा…

By PCB Author

October 17, 2020

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात महापालिका सभा होत असतात. या सभेचे पीठासन अधिकारी (मा. महापौर) यांच्या आसनासमोर प्रथेप्रमाणे मानदंड ठेवला जातो. सभा कामकाजामध्ये विरोधकांना प्रखर विरोधच्या वेळी आपले म्हणणे ठामपणे मांडून आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी विरोध करण्यासाठी मानदंडापर्यंत पळविण्याचा प्रघात आहे. लोकशाही परमपंरेमध्ये हा विरोधकांचा हक्क आहे. त्याच प्रमाणे सभेमध्ये स्फोटक वातावरण निर्माण झाल्यास मानदंड उचलला गेल्यास वातावरण शांत होते. त्याला प्रतिबंध करण्यासाठी मोठा अडथळा उभारला आहे तो प्रथम दूर करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे केली आहे. महापौर आणि महापालिका आयुक्त यांना त्या आशयाचे एक निवोदन मिसाळ यांनी दिले.

निवेदनात ते म्हणतात, काही दिवसापासून मनपाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये पीठासन अधिका-यांच्या (मा.महापौर) आसनासमोर मानदंडासमोर सत्ताधारी पक्षाने जाणीवपूर्वक एक अडथळा निर्माण केला आहे. जेणे करुन विरोधकांना मानदंडापर्यंत जाता येणार नाही. वस्तुत: सन २०१२ पासून हे नविन सभागृह अस्तित्वात आले. तेव्हा राष्ट्रवादी कॉग्रेसची सत्ता असताना राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने विरोधकांना कायम आदराची वागणूक दिलेली आहे. मानदंडासमोर अडथळा निर्माण करण्याची हि कल्पना कोणाच्या सुपिक डोक्यात आली ती चुकिची आहे. महापौर माई ढोरे यासुध्दा पूर्वी राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये होत्या. त्यावेळी राष्ट्रवादीने विरोधकांना अशी वागणूक दिली नाही. त्याच महापौर आता विरोधकांना अशी वागणूक देतात याचा खेद वाटतो. हा प्रकार पूर्वीपासून चालत आलेला प्रथेचा भंग करणारे आहे. तसेच विरोधकांच्या हक्कावर गदा आणली जात आहे.

मनपाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहातील मा. पीठासन अधिका-यांच्या आसना पुढील मानदंडाच्या समोरील अडथळा त्वरीत काढून टाकण्यात यावा. अन्यथा आपल्या कार्यालयासमोर धरणे आदोलंन करु याची कृपया नोंद घ्यावी, असा इशारा मिसाळ यांनी दिला आहे.