पिंपरी-चिंचवडच्या नगरसेवकांची केरळसाठी १ कोटी ६ लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांकडे धनादेश सुपूर्त

0
722

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या केरळवासीयांच्या मदतीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सर्वपक्षीय नगरसेवक आणि कर्मचारी धावून गेले आहेत. सर्वपक्षीय नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन केरळच्या पूरग्रस्तांना मदत देण्यात आली आहे. भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे व ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एकूण १ कोटी ६ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश बुधवारी (दि. १२) सुपूर्त करण्यात आला.

मुबंईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा धनादेश देण्यात आला. यावेळी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, मनसेचे गटनेते सचिन चिखले, अपक्ष गटनेते कैलास बारणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

गेल्या महिन्यात झालेल्या तुफान पावसामुळे संपूर्ण केरळ राज्य पाण्याखाली गेले होते. तेथील जनजीवन सततच्या पावसामुळे तेथील जनजीवन उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे केरळवासीयांच्या मदतीसाठी संपूर्ण देशवासीय धावले. त्याचप्रमाणे तेथील नागरिकांना पुन्हा उभे राहता यावे यासाठी देशभरातून आर्थिक व इतर मदतीचा ओघ सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केरळच्या मदतीसाठी आवाहन केले होते. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी केरळला एक महिन्याचे मानधन, तर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेतला. त्यातून जमा झालेला १ कोटी ६ लाखांच्या मदतनिधीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.