पिंपरी-चिंचवडचे पोलिस निर्ढावले; जमीन विक्री फसवणुकीच्या तक्रारीची आठ महिन्यांनी घेतली दखल

0
594

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र पोलिस आयुक्तालय करण्यासाठी वाढत्या गुन्हेगारीचे कारण दिले जाते. परंतु, येथील पोलिसच गुन्ह्यांना खतपाणी घालत असल्याचे समोर आले आहे. एकच जमीन १३ ते १४ जणांना विकून फसवणूक करणाऱ्या बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यासाठी संबंधित तक्रारदाराला वाकड पोलिसांनी तब्बल आठ महिने चकरा मारायला लावल्या. स्वतः पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनीही याप्रकरणात गुन्हा दाखल होणार नसल्याचे तक्रारदाराला सांगितले. परंतु, अप्पर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे यांच्या दट्ट्यानंतर तक्रार दाखल करून घेत चार आरोपींना अटक करावी लागली.

या प्रकरणी पत्रकार संतलाल रोशनलाल यादव (वय ४७, रा. काळेवाडी) यांनी पाठपुरावा केला. काळेवाडीतील साई डेव्हलपर्सचे संचालक बाबासाहेब चितळे, भाऊसाहेब काळे, आणि जितेंद्र तोरे यांनी पत्रकार यादव यांना बोरज-मळवली येथील गट क्रमांक १०० मधील ७१ गुंठ्यांपैकी ३ गुंठे जमीन देण्याच्या मोबदल्यात ८ लाख रुपये घेतले. यादव यांना जमीन दिल्याचा वडगाव मावळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी केली. परंतु, दीड वर्षे जमीन ताब्यात दिली नाही. त्यामुळे शंका बळावली आणि पत्रकार यादव यांनी बोरज-मळवली येथे जाऊन चौकशी केली असता जागा मालक नथु खिलारी, खंडु खिलारी आणि साई डेव्हलपर्सच्या भागिदारांनी गट क्रमांक १०० मधील ७१ गुंठे जमीन आधी १३ ते १४ जणांना आणि नंतर ती अन्य चार जणांना विकल्याचे समोर आले.

बनावट सात-बारा, तलाठ्याचा खोटा शिक्का आणि सहीद्वारे एकच जमीन अनेकांना विकून त्यांची फसवणूक करण्यात आली होती. त्यामुळे पत्रकार संतलाल यादव यांनी २ ऑक्टोबर २०१७ रोजी वाकड पोलिसांकडे तक्रार अर्ज आणि सोबत फसवणुकीचे पुरावे दिले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी यादव यांना सहा महिने खेटे मारायला लावले. पोलिस गुन्हा दाखल करत नसल्यामुळे पत्रकार यादव यांनी पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांची भेट घेऊन फसवणुकीचे सर्व पुरावे सादर केले. परंतु, शिंदे यांनीही याप्रकरणात गुन्हा दाखल करता येत नसल्याचे सांगितले. त्यामुळे पत्रकार यादव यांनी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला आणि अप्पर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे यांची भेट घेऊन आपबीती सांगितली.

अप्पर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे यांनी पोलिस उपायुक्त गणेश शिंदे आणि वाकड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना पुण्यात बोलावून घेत याप्रकरणात गुन्हा का दाखल होऊ शकत नाही?, असा प्रश्न केला. त्यामुळे पोलिस उपायुक्त शिंदे निरूत्तर झाले. अप्पर पोलिस आयुक्त देशपांडे यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर वाकड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तसेच दोन बिल्डर आणि दोन शेतकऱ्यांना अटक केली. त्यामध्ये नथू चिंधु खिलारी (वय ५५), खंडू चिंधु खिलारी (वय ५२, दोघेही रा. बोरज, मळवली, ता. वडगाव मावळ), बाबासाहेब तोलाजी चितळे (वय ४७) आणि भाऊसाहेब बाबुराव काळे (वय ४५, रा. सहकार कॉलनी क्रमांक १, ज्योतिबानगर, काळेवाडी) या चौघांचा समावेश आहे. जितेंद्र रामदास तोरे (वय ४५, रा. जळगाव) हा आरोपी पसार झाला आहे. अटक केलेल्या चौघांनाही मोरवाडी न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

एकच जमीन अनेकांना विकलेल्या या प्रकरणात पत्रकार, माजी सैनिकांसह सर्वसामान्यांची फसवणूक झाली आहे. स्वतः संबंधित पत्रकाराने पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यापर्यंत पाठपुरावा केला. त्यानंतरच पिंपरी-चिंचवडच्या पोलिसांनी याप्रकरणात गुन्हा दाखल केला. आठ महिने चकरा मारायला लावून पोलिसांनी पत्रकार आणि फसवणूक झालेल्या नागरिकांना प्रचंड मानसिक त्रास दिला. पिंपरी-चिंचवडच्या पोलिसांचा पत्रकारांना असा अनुभव येत असेल, तर तक्रार घेऊन जाणाऱ्या सर्वसामान्यांना किती भयानक अनुभव येत आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र पोलिस आयुक्तालय झाल्यास येथील गुन्हेगारीवर खरोखरच नियंत्रण मिळणार का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.