निवडणुका आणि त्यातून मिळणारी सत्ता म्हणजे मतदारांसाठी मनोरंजनाचा पंचवार्षिक नाट्य महोत्सवच असतो. या महोत्सवात नाटक सादर करणाऱ्या पात्रांनीच आपण आणि प्रतिस्पर्ध्यांनी कोणत्या भूमिका करायच्या हे ठरवून टाकलेले असते. राजकारणात काहीही घडू शकते आणि जे घडते ते राजकारणात सारेच माफ असते, असे म्हणतात. हे खरे मानले, तर राजकारण हा गांभीर्याने पाहावयाचा विषयच राहात नाही. गांभीर्याने पाहावयाचे थांबविले की एकूणच त्यातील विनोद लक्षात येऊ लागतो आणि राजकारण हा गंमत म्हणून, वेळ घालविण्याचे साधन म्हणून केवळ दुरून न्याहाळण्याचा करमणुकीचा प्रकार आहे, हे लक्षात येते. कधी कधी हे लक्षात यायला वेळ लागतो. काहींच्या मात्र ते लगेचच लक्षात येते. पण केव्हा लक्षात येते ते महत्त्वाचे नसते. कारण त्यातून निघणारा निष्कर्ष तोच असतो आणि तो अधिक ठाम झालेला असतो.

सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष निवडीपासून ते समितीच्या सदस्यांची निवड आणि महापौर तसेच स्थायी समितीच्या एक दोन सदस्यांच्या राजीनाम्यावरून भाजपमध्ये जे काही सुरू आहे, ते पाहता या राजकारणात करमणुकीचा मसाला ठासून भरलेला असल्याची खात्री होऊ लागली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ता राजकीय रंगभूमी बनली आहे. या रंगभूमीवर रोज एकाच नाटकाचे वेगवेगळ्या ढंगांतील प्रवेश सुरू आहेत आणि सध्या तरी या नाटकाचे सूत्र “तुझे माझे जमेना” हेच आहे. सत्तासुंदरी नाटकाच्या पहिल्या अंकातील प्रत्येक प्रवेशात पदाधिकाऱ्यांचे एकमेकांशी जमत नसल्याचे पिंपरी-चिंचवडमधील प्रसारमाध्यमांना साक्षात्कार झाल्याचे दिसते आणि प्रेक्षक काहीसा गोंधळात पडतो.

नाट्याचा हा पहिला अंक आपल्या आपल्या मंचावर सज्जडपणे वठविण्यासाठी चिंचवड आणि भोसरीतील दोन्ही नायक बाह्या सरसावून उतरले आहेत. या नाट्यसंहितेत इतिहास आहे आणि भूगोलही आहे. साहजिकच प्रसारमाध्यमे कधी एखाद्या प्रयोगातून कुणी निष्ठावान, कुणी नाराज, त्यातून राजीनामा, पुन्हा राजीनामास्त्र म्यान, स्थायीचे सभापतीपद अमक्या गटाकडे, राम-लक्ष्मणाची उपमा, स्थायीचा अध्यक्ष अमक्या गटाकडे असला तरी स्थायीमध्ये दुसऱ्याच गटाचे वर्चस्व बहाल करून टाकतो…हाच तो मनोरंजनाचा मसाला! गंमत म्हणजे या महानाट्याला लेखनाचा सलग असा धागा नाही. समोरच्या पात्राच्या तोंडून फेकल्या गेलेल्या संवादाची पुरेपूर परतफेड करणे व त्यातून मनोरंजनाचा निखळ आनंद प्रेक्षकास देणे एवढाच त्याचा उद्देश आहे.

भाजपच्या रंगमंचावरील करमणूक महानाट्यांचा प्रयोग तसा गेल्या महिनाभरापासून जोरात आहे. मुळातच हे एक दीर्घनाट्य असल्याने अजूनही या करमणूक नाट्याचा केवळ पहिलाच अंक सुरू आहे. काहीही झाले तरी महानाट्याचे कथानक मूळ मुद्द्यावर येऊच द्यायचे नाही, असाच जणू चंग कथासूत्र विणतानाच उभयपक्षी परस्पर सामंजस्याने बांधला गेला असावा, असे प्रथमदर्शनी वाटत असले तरी आहे त्या परिस्थितीतही जे काही वळण त्या कथासूत्रास मिळत आहे, त्यातही करमणुकीचा मसाला ठायीठायी ठासून भरलेलाच असल्यामुळे प्रेक्षकवर्ग आणि प्रसारमाध्यमे नाट्यानुभवात मनोभावे रंगून गेला आहे. दुसऱ्या बाजूने पहिल्याच नाट्यप्रयोगात पक्षाच्या पडद्याआडची पारदर्शकता चव्हाट्यावर आल्याच्या आनंदाने राष्ट्रवादीच्या मंचावर आनंदाच्या उकळ्या फुटल्या आणि पडदा उघडल्यानंतर हे नाटक कमालीचे रंगणार, हे त्यामुळेच स्पष्ट झाले. साहजिकच राष्ट्रवादीत उत्साहाचे वातावरण दिसत आहे.

आता पुढचे नाट्य रंगणार असा अंदाज आल्याने प्रेक्षकांचे लक्ष दोन्ही मंचांकडे लागले आहे. परस्परांच्या नावाने बोटे मोडण्याच अभिनय तसा सोपा नसतो. त्यासाठी कसदार सरावाची गरज असते. त्यातही हे नाटकच मुळात अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत बसवावे लागल्याने, त्याची संहिता, रंगमंच व्यवस्था, पात्र रचना, प्रकाश योजना सारे अचानक ठरवूनही नाटक वठत असल्याचा अनुभव प्रेक्षकांना येतो. त्याबद्दल प्रेक्षकांची पहिल्या अंकातील प्रत्येकाच्याच प्रवेशास पुरेशी दादही मिळत आहे. एकूण तीन अंकांचे हे करमणूकप्रधान नाटक, पुढे कोणती वळणे घेणार याविषयीची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये ताणली गेली आहे. कोणत्याही चांगल्या नाटकाचे हेच गमक असते. महापालिकेच्या राजकीय रंगमंचावरील या नाटकाचा पहिला अंक संपत आला आहे, आणि आता पडदा न उघडताच दुसऱ्या अंकाची थेट तिसरी घंटा वाजेल व दुसऱ्या अंकातील प्रवेश सुरू होतील, तेव्हाही रंगमंचावर आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे या दोन नायकांच्याच अभिनयाची कसोटी लागणार आहे.