पिंपरी-चिंचवडचा अभिमान ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’चे काम प्रगतीपथावर!

0
595

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडकरांसह तमाम शिव-शंभू प्रेमींच्या अभिमानाची बाब असलेला ‘स्टॅच् ऑफ हिंदुभूषण’ अर्थात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वांत उंच पूर्णाकृती पुतळ्याचे काम प्रगतीपथावर आहे.पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून मोशी येथे शंभूसृष्टी उभारण्याचे काम सुरू झाले आहे. याठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचा तब्बल १४० फूट उंच पुतळा उभारण्यात येणार आहे. पुतळ्याचे काम दिल्ली येथील कार्यशाळेत सुरू आहे. त्याची पाहणी आमदार लांडगे यांनी सोमवारी केली. यावेळी माजी महापौर राहुल जाधव, नगरसेविका अश्विनी जाधव, सारिका बोऱ्हाडे, नितीन बोऱ्हाडे, संतोष जाधव आदी उपस्थित होते.

मोशी- बाऱ्हाडेवाडी येथे उभारण्यात येणारा छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचा चौथरा ४० फूट असून, पुतळ्याची उंची १०० फूट इतकी असणार आहे. जागतिक किर्तीचे शिल्पकार राम सुतार आणि प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे.
…. असा आहे स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण!
– छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची : १४० फूट
– चौथऱ्यांची उंची : ४० फूट
– एकूण परिसर : सुमारे ३ एकर
– ठिकाण : मोशी- बोऱ्हाडेवाडी, पिंपरी-चिंचवड.
– सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा पुतळा : १० फूट
– सरदार आणि मावळे एकूण १६ पुतळे : १० फूट
– पुतळ्याच्या आवारात ओपन एअर थिएटर
– प्रमुख प्रसंगांवर आधारित ब्राँझ म्यूरल्स
– शंभुराजांची गाथा ऐकण्यासाठी ४० बाय २० फूट एल.ई.डी. स्क्रीन
– चलचित्र आणि प्रकाश योजना
– शंभूराजांचे हॉलोग्राफिक प्रेझेंटेशन व्यवस्था
– रंगमंचाच्या दोन्ही बाजूस कंट्रोल रुम
– पुतळ्याचा सांगाडा एसएसमध्ये होणार.
– पुतळ्याच्या आतमध्ये लिफ्ट असेल. त्यामुळे मेंटनन्स करता येईल.
विशेष म्हणाजे, सुमारे १००० वर्षे पुतळा सुस्थितीत राहील, असा कामाचा दर्जा ठेवण्याचा संकल्प आहे.

लवकरच पुतळ्याचे काम पूर्ण होईल : आमदार लांडगे
‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ अर्थातच छत्रपती संभाजी महाराज यांचा सर्वात उंच पुतळा उभारण्याचे भाग्य लाभले, याचे समाधान वाटते. पिंपरी-चिंचवडमधील बोऱ्हाडेवाडी मोशी येथे भव्य पुतळा व शंभू सृष्टीचे काम सुरु आहे. लवकरच हा पुतळा पूर्ण होवून शंभूसृष्टीमध्ये उभारण्यात येईल. ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’हा हिंदू बांधवांसह मराठ्यांसाठी हिंदू धर्म आणि संस्कृती संरक्षणाची कायम प्रेरणा देत राहील, असा आम्हाला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे.

नगरसेविका सारिका बोऱ्हाडे म्हणाल्या की, मोशी आणि परिसरात शहरातील मोठे प्रकल्प उभारले जात आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून माझ्या प्रकारात साकारात आहे, याचा अभिमान वाटतो.

माजी महापौर राहुल जाधव म्हणाले की, समाविष्ट गावांच्या विकासाला खऱ्या अर्थाने आमदार महेश लांडगे यांनी चालना दिली. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारला जात आहे. महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून या गावांवर अन्याय झाला. मात्र, आमदार लांडगे यांनी समाविष्ट गावांतील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत.