पिंपरी चिंचवडकर पालख्या वाहण्यापुरतेच आहे काय ?

0
612

थर्ड आय – अविनाश चिलेकर –

पिंपरी चिंचवड शहर १९७८ ला जन्माला आले तेच मुळी सोन्याचा चमचा तोंडात धरून. गावकीचा रांगडा तोंडावळा होता तो आज `बेस्ट सिटी`, `मेट्रो सिटी` असा झाला. सुखसमृध्दी अगदी पायाशी लोळण घेतेय. लक्ष्मी-सरस्वती इथे पाणी भरतात असे म्हटले तरी वावगे ठरू नये. साता जन्माची पुण्याई पदरी आहे म्हणा. इथे प्रत्येक भूमिपुत्राच्या घरात धारकरी आणि माळकरी दोन्हींचा संस्कार आहे, म्हणजे घरघरात पैलवान आहे आणि किर्तन- प्रवचन आहे. मनात आणू ते करण्याची प्रबळ इच्छाशक्तीही आहे. इतके सगळे असून आजही राजकीय दरबारात सवतीची वागणूक मिळते, हिच तमाम पिंपरी चिंचवडकरांच्या मनातील खंत आहे. नेहमी ताटाखालचे मांजर व्हायचे. हे असे किती दिवस चालणार हा प्रश्न आहे. गेल्या ५० वर्षांचा राजकीय इतिहास तागडीत टाकला तर, एक गोष्ट नक्की सांगता येईल. काँग्रेस असो वा राष्ट्रवादी त्यांनी या शहराला राज्याच्या राजकारणात कधीही मानाचे पान दिलेले नाही की, इथल्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखलेला नाही. दुसरीकडे भाजपने अगदी भरभरून दिले आहे हे त्रयस्त म्हणून तुम्हा आम्हाला मान्य करावेच लागेल. या मातीत त्या लायकीची माणसे नाहीत असे बिलकूल नाही. दुसऱ्याच्या ओजळीने पाणी प्यायची सवय जात नाही, माणसिक गुलामी कायम आहे. आज प्रश्न विधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठीचा आहे. विधान परिषदेची निर्मितीच मुळात विद्यावानांसाठी आहे. म्हणूनच ते वरिष्ठ सभागृह आहे, राजकीय पुनर्वसनाची सोय नाही. सद्या राजकीय मांडवली की तडजोडीत परिषदेचे सदस्यत्व दिले घेतले जाते हा भाग वेगळा.

आज पिंपरी चिंचवडपुरता विचारात करू या. विधान परिषदेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेमधून निवडूण द्यायची वेळ असली तरी कधीही पिंपरीचा माणूस दिसला नाही. (आमदार लक्ष्मण जगताप हे अपवाद, पण ते स्वतःच्या हिंमतीवर अपक्ष लढले आणि जिंकले होते) शिक्षक मतदारसंघासाठीसुध्दा कधीही इथला शिक्षक दिसला नाही. पदवीधर मतदारसंघात प्रकाश जावडेकर यांच्या नंतरही चारवेळा निवडणूक झाली, पण तेव्हाही पिंपरी चिंचवडमधील व्यक्ती लायकीची वाटली नाही. विधानसभा सदस्यांमधून निवडायचे आमदार असले तरी कधीही या मातीतला कार्यकर्ता दिसला नाही. आता राज्यपाल नियुक्त १२ जागांवर चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधूनही जाणकार राजकीय कार्यकर्ते इच्छुक आहेत. त्यांचा अनुभव दांडगा आहे. राष्ट्रवादीतून माजी महापौर योगेश बहल, पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे आणि काँग्रेसमधून पक्षाचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी इच्छा व्यक्त केली. या पैकी एकाला उमेदवारी मिळायला हरकत नाही, पण आजवरचा अनुभव पाहिला तर शक्यता धूसर आहे. कारणे अनेक सांगितली जातील. एकवेळ पुणे शहरातील व्यक्तीला संधी मिळेल. पण गुडघ्याला बाशिंग बांधून उभे असलेल्या बहल, वाघेरे किंवा साठे यांच्या बाबतीत तो योग दिसत नाही. पवार कंपनीला कदाचित उपरती झालीच तर आगामी पालिका निवडणुकिची समिकरणे साधण्यासाठी बहल यांना संधी मिळेलही. काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय यांनी आजवर अशा पदांसाठी पुणेकरच दिसले. पुणे शहराला सहा वेळा विधान परिषद मिळाली. प्रा. रामकृष्ण मोरे सरांची स्थानिक स्वराज्य सस्थेवर निवड हीसुध्दा पुणेकर म्हणनच होती हे विसरता येत नाही.

भाजपने भरभरून दिले, पण…
पिंपरी चिंचवडला भाजपने अगदी भरभरून दिले होते, हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बड्या नेत्यांनाही मान्य करावे लागेल. महापालिकेत भाजपची सत्ता नंतर आली, पण राज्यात सत्ता असताना पदे दिली हे महत्वाचे. अगदी स्वप्नातसुध्दा नसताना एक हाडाचा मागासवर्गीय कार्यकर्ता म्हणून अमर साबळे यांना थेट राज्यसभेची संधी मिळाली होती. ते थेट प्रतोद झाले होते. या निर्णयामुळे पुणे- मुंबई शहरातील भले भले नेते अवाक झाले होते. शहराला भाजपने तिसरा खासदार दिला होता. त्यातून पुढे या शहरातून पक्षाला बळ मिळाले. आजवर काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने कितीतरी पुणेकरांना राज्यसभा अशी हसत हसत दिली मात्र पिंपरी चिंचवडकर दिसले नाहीत हा इतिहास आहे. राज्यात सत्ता असतानाच सचिन पटवर्धन यांच्यातील सहकार क्षेत्राचा अभ्यास व कायद्याचे ज्ञान पाहून त्यांना थेट राज्य लोक लेखा समितीचे अध्यक्षपद एकदा नाही तर सलग दोन वेळा मिळाले. राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेले हे पद होते. भाजपने त्याचा कधीही गाजावाजा केला नाही. अमित गोरखे या युवकाचे नेतृत्वगूण व कर्तृत्व हेरून मातंग समाजातील म्हणून त्या समाजाच्या हितासाठी स्थापन केलेल्या लोकशाहिर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्षपद त्यांना बहाल केले. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे जाणीवपूर्वक पिंपरी चिंचवडसाठी केले होते. तिसरे राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले पद म्हणजे पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकऱणाचे अध्यक्षपद. तिथेही पक्षातील निष्ठावंत म्हणून सदाशिव खाडे मास्तरांची निवड फडणवीस यांनी केली होती. या शहरातील आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांना राज्यमंत्री पद दिले नाही, पण किमान त्यांचे नाव सतत त्यासाठी चर्चेत राहिले होते. कदाचित यावेळी भाजपची सत्ता असती तर शहरात प्रथमच मंत्रीपदसुध्दा आले असते. आतासुध्दा पदवीधर मतदारसंघासाठी सचिन पटवर्धन यांच्या नावाची भाजपमधून चर्चा आहे. थाडक्यात काय तर भाजपने या शहराला राज्याच्या राजकारणात मानाचे पान दिले, सन्मान राखला.

राष्ट्रवादीसाठी ही दुभती गाय –
राष्ट्रवादीने गेल्यावेळी मावळ मतदारसंघातून राहुल नार्वेकर या पाहुण्याला संधी दिली होती. पराभव झाला तर विधान परिषद द्याचे हे अगोदरच ठरलेले होते. तिथे योगेश बहल यांना लढायला सांगितले, पण हारणारी लढाई का म्हणून लढायची असे समजून त्यांनी नकार दिला होता. ठरल्यानुसार नार्वेकर लोकसभेला हरले पण लगेचच विधान परिषद मिळालीसुध्दा. कारण ते विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निबांळकरांचे जावई होते. बारामतीर अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडकरांच्या जीवावर निरंकूश सत्ता उपभोगली. त्यांनी सत्तेचा वापर करून शहराचा चांगला विकासही केला, पण राज्याच्या निर्णय प्रक्रीयेत या मातीतला माणूस सहभागी करून नाही घेतला. राज्यसभेसाठी उद्योगपती राहुल बजाज, थरमॅक्स कंपनीच्या अनु आगा यांनी खुद्द शरद पवार यांनी संधी दिली होती, पण तेही पुणेकर उद्योजक म्हणून. या शहराच्या अस्मितेचा त्यांनीही कधी विचार केला नाही. दिवंगत नाना शितोळे यांच्यासह माजी महापौर तात्या कदम, आझम पानसरे, विलास लांडे, नाट्य परिषदेसाठी वाहून घेतलेले जेष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, मंगला कदम यांचे राजकीय पुनर्वसन केले पाहिजे, असे ना मोठ्या पवार यांना वाटले ना धाकट्या पवारांना त्याचे काही पडले. बारामतीकरांच्या पालखीचे भोई म्हणूनच पिंपरी चिंचवडच्या भूमिपुत्रांचा वापर झाला, अशी रुखरुख तमाम गाववाल्यांना आणि बहुसंख्य पवार समर्थकांनाही आहे. ते बिच्चारे बोलत नाहीत. कुठेही कमी नाही अगदी तोडीस तोड असे हे स्थानिक नेते पण साहेब-दादांच्या पुढे मागे कऱण्यात त्यांचे आयुष्य गेले. मावळ लोकसभेला गेल्यावेळी नाही नाही म्हणत अजित पवार यांनी आपले चिरंजीव पार्थ पवार यांना रिंगणात उतरवले, तिथेच माशी शिंकली आणि पिंपरी चिंचवडकरांची अस्मिता अक्षरशः भडकली. आणखी किती पिढ्या यांच्याच सतरंज्या उचलायच्या असे उघडपणे लोक बोलू लागले. समोर नाही बोलले पण त्यांनी करून दाखवले. त्यामुळेच शिवसेनेचे श्रीरंग बारणे दुसऱ्यांदा धो धो मतांनी जिंकले. महापालिकेलाही भाजप जिंकण्यामागे `आमचे काय`, हा स्थानिकांचा मार्मिक प्रश्न राष्ट्रवादीने दुर्लक्षिला होता. राष्ट्रवादीच्या समोर समर्थ पर्याय नव्हता म्हणून पिंपरीतून अण्णा बनसोडे जिंकले, अन्यथा राष्ट्रवादीसाठी तेही शक्य नव्हते. राष्ट्रवादीने पिंपरी चिंचवडकडे दुभती गाय म्हणून कायम पाहिले. आता तीच गाय भाजपच्या दावणीला आहे, हे लक्षात असू द्या. दूध देणाऱ्या गाईला हिरवा चारा, सुग्रास खाद्य द्यावे लागते, ते काम भाजपने पध्दतशीर केले म्हणून ते टिकले व फोफावलेसुध्दा. आता राष्ट्रवादीला पुन्हा या शहरात सत्ता प्रस्थापित करायची तर या शहराचा मान सन्मान होईल असे काही निर्णय घ्यावे लागतील. विधान परिषद ही एक संधी आहे.