पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणा-या पवना धरणात 30 टक्के पाणीसाठा..

0
416

पिंपरी, दि. १६ (पीसीबी)- पिंपरी-चिंचवडसह मावळ भागातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या पवना धरणात आजमितीला 30.75 टक्के आहे. जूनअखेरपर्यंत पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे. मागीलवर्षीपेक्षा यंदा 6 टक्के कमी पाणी असून यंदा उष्णतेच्या झळा तीव्र झाल्याने पवना धरणांमधील पाण्याची मागणी वाढली आहे.

पवना धरणातील पाण्याचा वापर शेतीसह मावळ आणि पिंपरी-चिंचवड मधील नागरिकांना पिण्यासाठी होतो. सध्या धरणातून मागणीप्रमाणे पाणीपुरवठा केला जात आहे. पुढील काही दिवसांत धरणांमधील पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी झपाट्याने खाली जाण्याची शक्यता आहे.

पवना धरणात आजमितीला 30.75 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी आजअखेर 36.65 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पवना धरणात 6 टक्के पाणीसाठा कमी आहे. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने सप्टेंबरमध्येच धरण 100 टक्के भरले होते. परंतु वाढते तापमान व पाण्याची वाढती मागणी या बाबींचा विचार करता पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन पवना धरणाचे शाखा अभियंता समीर मोरे यांनी केले.