पिंपरी आणि पुणे महापालिकेत पुढच्या वर्षी राष्ट्रवादीचा महापौर…..रुपाली चाकणकर

0
310

सत्ता उलथून टाकण्याची क्षमता महिलांमध्ये आहे…..वैशाली काळभोर

पिंपरी,दि. 19 (पीसीबी) लोकनेते खासदार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेत पुढील वर्षी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचाच महापौर झाला पाहिजे. असा निर्धार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिलांनी केला आहे. ‘राष्ट्रवादी’ फक्त पक्ष नसून राष्ट्रवादी एक विचारधारा आहे. महिला भगिनींचा सन्मान ठेऊन सर्व सामान्यांना सोबत घेऊन जाणारा पक्ष म्हणजेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले.

शुक्रवारी (दि. 18 जून) काळभोर नगर, चिंचवड येथे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांनी आयोजित केलेल्या ‘निर्धार मेळाव्यास’ निरीक्षक उज्वला शेवाळे, पुणे जिल्हा निरीक्षक कविता आल्हाट तसेच पुष्पा शेळके, सविता धुमाळ, पल्लवी पांढरे, संगिता कोकणे, मनिषा गटकळ, मिरा कुदळे, कविता खराडे, आशा मराठे, स्वप्नाली असवले, सोनाली जाधव, आशा शिंदे आदींसह नवनियुक्त महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. यावेळी रुपाली चाकणकर यांच्या हस्ते मेधा पळशीकर, सु्प्रिया हारकुलकर, वैशाली घाडगे, हेमलता कदम, संगिता शहा, सविता खडतरे, शैला सातपुते, रंजना रणदिवे, छाया पवार, अंजुषा नैलेकर, तेजस्विनी अंकलगी, राखी गावंडे यांच्यासह दिडशेंहून जास्त महिलांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी रुपाली चाकणकर म्हणाल्या की, ज्या – ज्या महापालिका यापुर्वी राष्ट्रवादीच्या ताब्यातून गेल्या त्या सर्वमहानगरपालिकांमध्ये पुन्हा राष्ट्रवादीचा महापौर व्हावा यासाठी पक्ष संघटना सक्षमपणे उभारुन व्युहरचना केली जात आहे. यामध्ये महिला संघटनेवर विशेष जबाबदारी आहे. आज पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादीची जम्बो कार्यकारीणी जाहिर झाली हा त्याचाच एक भाग आहे. लोकनेते खासदार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकार कोरोनाचा यशस्वीपणे मुकाबला करीत आहे. हे जनतेच्या पाठिंब्यामुळे शक्य आहे.

लोकनेते शरद पवार हे केंद्रिय कृषीमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळेच शेतकरी सक्षमपणे उभा राहिला. केंद्रातील मोदी सरकार या बळीराजाला उध्वस्त करण्याचे काम करीत आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे शेतकरी, कामगारांबरोबरच देशातील कोट्यावधी जनता अस्वस्थ आहे. भांडवलदारधार्जिणे निर्णय घेतल्यामुळे देशभर आर्थिकमंदी आणि बेरोजगारी वाढली आहे. या बेरोजगारीचा फटका पुणे, पिंपरीलाही मोठ्या प्रमाणात बसत आहे. त्यासाठी पिंपरी, पुण्यासह यापुर्वी ज्या – ज्या महानगरपालिकेत राष्ट्रवादीचा महापौर होता त्या सर्व महापालिकेत पुन्हा राष्ट्रवादीचाच महापौर व्हावा असा निर्धार करीत राष्ट्रवादी महिला कामाला लागल्या आहेत. गडचिरोली, चंद्रपूर, धुळे, जळगाव पासून संपुर्ण महाराष्ट्रात सर्वत्र राष्ट्रवादीची संघटना उभी आहे. युवकांना रोजगार, स्वयंरोजगार देणारा पक्ष आहे. विद्यार्थ्यांना, युवतींना बरोबर घेऊन जाणारा, महिलांना पन्नास टक्के आरक्षण देणारा, महिला भगिनींना, शेतक-यांना सन्मान देणारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आहे असेही चाकणकर म्हणाल्या.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर म्हणाल्या की, महिलांमध्ये आर्थिक सक्षमता यावी म्हणून महिलांना पन्नास टक्के आरक्षण देऊन त्यांचा सन्मान खासदार शरद पवार यांनी केला. सर्व तळागाळातील घटकांना बरोबर घेऊन जाणारे लोकनेते शरद पवार आणि बोलून नाही तर करुन दाखविणारे नेतृत्व म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजनाखाली शहराचा विकास झाला आहे. येथिल उद्योग, व्यवसायांमुळे महिलांमध्ये आर्थिक सक्षमता आली आहे. सत्ता उलथून टाकण्याची क्षमता महिलांमध्ये आहे. मागील साडेचार वर्षात पिंपरी चिंचवड मनपात सत्ता नसतानाही सर्वात मोठी महिला पक्ष संघटना म्हणून राष्ट्रवादी शहर महिला संघटना आहे. पहिल्या टप्प्यात सव्वाशे, दुस-या टप्प्यात साठ आणि आता दिडशेंहून जास्त अशी साडेचारशेहून जास्त महिलांची शहर आणि विधानसभा, प्रभागस्तरावर निवड करण्यात आली आहे. पिंपरी मनपातील भाजपाचा भ्रष्ट्राचार उघडकीस आणण्यासाठी वेळोवेळी राष्ट्रवादीच्या महिलांनी रस्त्यावर उतरुन आंदोलने, निदर्शने केली. पुढील काळातही सर्व समाजातील महिलांना बरोबर घेऊन पुढचा महापौर राष्ट्रवादीचाच करण्याचा निर्धार शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांनी व्यक्त केला.