पिंपरी आणि चिंचवडमध्ये रोडरोमियोंवर सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई; ३५ जणांना समज; बेशिस्त ३३ वाहनांवर कारवाई

0
1326

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – पिंपरीतील जय हिंद कॉलेज, डॉ.डी.वाय पाटील कॉलेज संत तुकारामनगर आणि चिंचवड मोहननगर येथील प्रतिभा महाविद्यालयाच्या आवारात पिंपरी पोलिसांनी आज (गुरुवार) पुन्हा कारवाई केली. शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी नसताना देखील शाळेच्या आवारात आणि गेट समोर उभे राहून टवाळक्या करणाऱ्या ३५ रोडरोमियोंना ताब्यात घेण्यात आले. तसेच बेशिस्त ३३ वाहनांवर कारवाई करण्यात आली.  

पिंपरी पोलिसांनी शाळा महाविद्यालये बाहेर होणाऱ्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी बुधवार (दि.२९) पासून  कारवाई करण्यास सुरुवात केली होती. पोलिसांनी आज (गुरुवार) पुन्हा सकाळी दहा ते दुपारी एकच्या दरम्यान पिंपरीतील जय हिंद कॉलेज, डॉ.डी.वाय पाटील कॉलेज संत तुकारामनगर आणि चिंचवड मोहननगर येथील प्रतिभा महाविद्यालयाच्या आवारात पुन्हा कारवाई करुन ३५ रोडरोमियोंना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्या पालकांना बोलवून त्यांच्या समोर या रोडरोमियोंना समज दिली असून त्यांच्यावर मुंबई पोलीस अधिनियमान्वये कारवाई करुन सोडून देण्यात आले.

पोलिसांनी महाविद्यालय आणि शाळे बाहेर बेशिस्तपणे उभे असलेल्या ३३ वाहनांवर कारवाई करुन त्यांचे वाहन क्रमांक वाहतूक विभागाला दिले आहेत. त्यांच्या मालकांवर कडक कारवाई केली जाणार आहे. शाळा महाविद्यालय परिसरात होणारे गैर प्रकार रोखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांनामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी अशा प्रकारची अचानकपणे केली जाणारी कारवाई सुरुच राहणार असल्याची माहिती पिंपरी पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिली आहे.