Pimpri

पिंपरीत सट्टा बाजार चालवणाऱ्या दोघांना अटक

By PCB Author

October 29, 2018

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – सट्टा बाजार चालवणाऱ्या दोघा जणांना पिंपरी पोलिसांनी अटक केली असून पाकिस्तान विरुध्द ऑस्ट्रेलिया या क्रिकेट मॅचवर ते बेटिंग घेत होते. ही कारवाई रविवारी (दि.२८) रात्री अकराच्या सुमारास पिंपरीतील वैभवनगरमध्ये असलेल्या संत कंवर राम पार्क येथील आरोपींच्या राहत्या घरात करण्यात आली.

राम गोवर्धन बजाज (वय ४४, रा. वैभवनगर, पिंपरी), गोविंद प्रभूदास ललवाणी (वय ४१, रा. वैष्णव देवी मंदिराजवळ, पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर मुंबई जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री पिंपरी पोलिसांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, पिंपरीतील वैभवनगरमध्ये असलेल्या संत कंवर राम पार्क येथे सट्टा बाजार सुरु असून पाकिस्तान विरुध्द ऑस्ट्रेलिया या क्रिकेट मॅचवर बेटिंग घेतली जात आहे. यावर पिंपरी पोलिसांनी रात्री अकराच्या सुमारास त्या ठिकाणी छापा टाकून आरोपी राम आणि गोविंद या दोघांना अटक केली. ते त्यांच्या घरातूनच सठ्ठाबाजार चालवत असल्याने पोलिस तपासात समोर आले. पोलिसांनी त्यांच्या घरातून एक एलईडी टीव्ही, १६ मोबाईल फोन यासह एकूण २ लाख २३ हजार ७१६ रुपयांचा ऐवज जप्त केला. आरोपींवर मुंबई जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे अधिक तपास करत आहेत.