पिंपरीत रेल्वेमध्ये रक्ताच्या उलट्या झाल्याने अज्ञात महिलेचा मृत्यू

0
1252

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – रक्ताच्या उलट्या झाल्याने मुंबई-नागरकोईल एक्सप्रेस रेल्वेच्या महिला डब्यामध्ये एका अनोळखी महिलेचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. १३) सायंकाळी साडेचारच्या सुमारास पिंपरी येथून उघडकीस आली.  महिलेची अद्याप ओळख पटू शकलेली नाही.

रेल्वे पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी मुंबई-नागरकोईल एक्सप्रेस या रेल्वेमधील महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या एका महिलेला रक्ताच्या उलट्या झाल्या. ही बाब तेथील महिलांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ याची माहिती रेल्वे गार्डच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार पिंपरी रेल्वे पोलिसांनी रेल्वेच्या महिला डब्यातून संबंधित महिलेला सायंकाळी साडेचारच्या सुमारास खाली उतरवून घेतले. तसेच तिला तात्काळ उपचारासाठी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. मृत महिला रंगाने गोरी, चेहरा गोल,  उंची चार फूट तीन इंच, अंगाने सडपातळ, अंगात पांढऱ्या रंगाचा फुल शर्ट आणि पिवळा लेहंगा आहे. या महिलेविषयी कोणालाही काही माहिती मिळाल्यास त्यांनी त्वरीत पिंपरी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.