Banner News

पिंपरीत राज्य गुप्त वार्ता, गुंडा विरोधी पथकाचे कार्यालय होणार

By PCB Author

January 10, 2022

– पोलीस गस्तीसाठी महापालिका १०० ‘स्मार्ट बाईक्स’ देणार पिंपरी, दि.१० : पिंपरी – चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू झाल्यानंतर गेल्या तीन वर्षात आयुक्तालयाचा विस्तार वाढत चालला आहे. त्याअनुषंगाने महापालिकेनेही स्मार्ट सिटीबरोबरच स्मार्ट पोलीसिंगसाठी पुढाकार घेतला आहे. ‘पीसीएनटीडीए’कडून हस्तांतरीत झालेली मोकळी जागा राज्य गुप्त वार्ता विभागाच्या कार्यालयासाठी देण्यात येणार आहे. आकुर्डी – गंगानगर येथील पांडुरंग काळभोर सभागृहातील हॉल आयुक्तालयाच्या गुंडा विरोधी पथकाच्या कार्यालयासाठी देण्यात आला आहे. तसेच पोलीस गस्तीसाठी विविध सुविधांनी सज्ज असलेल्या १०० पल्सर स्मार्ट बाईक्स दिल्या जाणार आहेत.

पुणे पोलीस आयुक्तालयातील पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, एमआयडीसी भोसरी, दिघी, सांगवी, वाकड, हिंजवडी पोलीस ठाणे तर पुणे ग्रामीण मधील देहूरोड, तळेगाव – दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, आळंदी आणि चाकण पोलीस ठाण्यांचा समावेश करून १५ ऑगस्ट २०१८ रोजी पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालय स्वतंत्रपणे कार्यान्वित करण्यात आले. त्यानंतर चिखली पोलीस ठाणे नव्याने सुरू करण्यात आले. पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाल्यानंतर चिचवड येथे वाहतुक विभागासाठी स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आले. आयुक्तालय हद्दीत ठिकठिकाणी गुन्हे शाखा युनिट कार्यालये सुरू करण्यावर भर देण्यात आला. सामाजिक सुरक्षा पथक, प्रत्येक पोलीस ठाणेनिहाय विशेष बाल पोलीस पथक, सायबर सेल कार्यान्वित करण्यात आले. आता पिंपरी – चिंचवड शहरात राज्य सरकारच्या गृह विभागाअंतर्गत राज्य गुप्ता वार्ता विभागाचे कार्यालयही येणार आहे.

पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून (पीसीएनटीडीए) महापालिकेला सेक्टर क्रमांक नऊ येथील मोकळी जागा हस्तांतरीत करण्यात आली आहे. या जागेत बास्केट बॉल ग्राऊंड विकसित करण्यात आले असून क्लब हाऊस तयार करण्यात आला आहे. याशिवाय इतर मोकळी जागाही आहे. ही मोकळी जागा राज्य सरकारच्या गृह विभागाअंतर्गत राज्य गुप्ता वार्ता विभागाच्या कार्यालयासाठी देण्यात येणार आहे. ही जागा गुप्ता वार्ता विभागाला नि:शुल्क वापरण्यासाठी देण्यात येणार आहे.

आकुर्डी – गंगानगर येथील पांडुरंग काळभोर सभागृहातील हॉल वैद्यकीय विभागाअंतर्गत मध्यवर्ती औषध भांडार विभागाला औषध ठेवण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. या ठिकाणी पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुंडा विरोधी पथकाचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयासाठी जागा मिळण्याबाबत गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त यांनी मागणी केली होती. त्यानुसार, स्थानिक लोकप्रतिनिधींनीही शिफारस केली आहे. त्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभाग निर्धारीत करतील त्या दराने गुंडा विरोधी पथकाच्या कार्यालयासाठी हॉल देण्यात येणार आहे. पिंपरी – चिंचवड शहर आणि शहरालगतच्या हिंजवडी, चाकण, तळेगाव-दाभाडे येथे आयटी, ऑटोमोबाईल कंपन्या तसेच इतर औद्योगिक वसाहतीमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती वाढली आहे. त्यासोबतच वाहतुक कोंडी, गुन्हेगारी आणि चोऱ्या असे प्रकारही वाढत आहेत. त्यासाठी वाहतुक नियंत्रण व नियमनाच्या अनुषंगाने तसेच छोट्या-मोठ्या गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पोलीस गस्तीची आवश्यकता आहे. त्याकरिता मोटार सायकल हे एक प्रभावी साधन आहे. मोटारसायकलवर पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने कमीत कमी वेळात अरूंद गल्ली बोळ, झोपडपट्टी आदी ठिकाणी पोहोचण्यास मदत होते. त्यामुळे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलीस गस्तीसाठी १०० पल्सर या स्मार्ट बाईक्ससोबत दोन माईक, फ्लॅश लाईट, कॅमेरा, जीपीएस टॅकींग सिस्टीम, जॅमर होल्डर्स, हेल्मेट विथ हेल्मेट होल्डर अशी अत्याधुनिक सुविधांची मागणी केली आहे.

कोरोना प्रादूर्भाव काळात महापालिका आणि पोलीसांमार्फत मास्क न वापरणाऱ्या विना परवाना अनावश्यक फिरणाऱ्या नागरिकांकडून वसुल करण्यात आलेले दंडात्मक शुल्क महापालिका कोषागरात जमा करण्यात आले आहे. या रकमेतून परताव्यापोटी पोलीस खात्यास स्मार्ट बाईकसह इतर सुविधा पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी १ कोटी १० लाख रूपये खर्च होणार आहेत. त्याअनुषंगाने महापालिकेच्या २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात स्वतंत्र लेखाशिर्ष नसल्याने उपसुचनेद्वारे हा विषय मंजुर करण्यात आला आहे.

आजी – माजी पोलीस आयुक्तांचा पुढाकार – शहराचे पहिले पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी चाकण पोलीस ठाण्यातून म्हाळुंगे, देहूरोड पोलीस ठाण्यातून रावेत आणि तळेगाव – दाभाडे पोलीस ठाण्यातून शिरगाव या स्वतंत्र चौक्यांचे पोलीस ठाण्यात रूपांतर होण्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. दुसरे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी देखील यासाठी पाठपुरावा केला. ४ जानेवारी २०२१ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या पोलीस ठाण्यांना मंजुरी मिळाली. पुढील प्रशासकीय सोपस्कार झाल्यानंतर या चौक्या पोलीस ठाणे म्हणून कार्यान्वित होतील. आता शहराचे तिसरे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाढ करण्याचा प्रस्ताव महासंचालकांकडे पाठवला आहे. त्यात पुणे ग्रामीण मधील वडगाव – मावळ, कामशेत, लोणावळा ग्रामीण आणि लोणावळा शहर या पोलीस ठाण्यांचा समावेश पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयात करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

बॉम्ब शोधक-नाशक पथक, श्वान पथक कधी स्थापणार ? पोलीस आयुक्तालयाचा विस्तार वाढवायचे प्रयत्न एकीकडे होत असले तरी गंभीर गुन्ह्यांच्या तपासात महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडण्यासाठी आवश्यक असणारे बॉम्ब शोधक-नाशक पथक, श्वान पथक, ठसे तज्ञ विभाग हे तपास प्रक्रीयेतील महत्वाचे विभाग शहरात अद्याप सुरू झालेले नाहीत. त्यामुळे मोठा गुन्हा घडल्यानंतर पोलीसांना पुणे शहरातून संबंधित पथक येण्याची वाट पाहत बसावे लागते. त्यासाठी हे विभागही शहरात लवकरात लवकर सुरू होणे गरजेचे आहे.