पिंपरीत महामानवाला अभिवादन करण्यासाठी भीमसागर लोटला

0
666

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – भारतीय राज्य घटनेचे  शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती  पिंपरी –चिंचवड शहरात अमाप   उत्साहात  आज (रविवारी) साजरी करण्यात आली. महामानवाला अभिवादन करण्यासाठी  पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भीम अनुयायींची मोठी  गर्दी केली होती. डॉ. आंबेडकरांना अभिवादन  करण्यासाठी अवघा निळा सागर लोटल्याचे चित्र दिसत होते.

शहर व परिसरातून आलेल्या  भीम अनुयायांनी   डॉ. आंबेडकर यांच्या  पुतळ्याला पुष्पहार घालून वंदन केले.    शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटना तसेच राजकीय पक्षांनी विविध उपक्रमांव्दारे महामानवाला अभिवादन केले. तर भारिप बहुजन महासंघ, दलित पॅंथर, लोकजनशक्ती पार्टी, भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या  (आठवले गट) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महामानवाला अभिवादन केले.

आंबेडकर चौक परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला होता.  शहराच्या विविध भागांमधून   काढलेल्या मिरवणुकांमुळे मोरवाडी चौकातून आंबेडकर पुतळ्याकडे येणारी लेन वाहतूकीसाठी बंद करण्यात आली होती.  महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांना भीम अनुयायांनी दिवसभर गर्दी केली होती. अनुयायांना  सोयी-सुविधा पुरविण्यासाठी विविध पक्ष, संघटना व सामाजिक संस्थांनी  मोठे सहकार्य केले.

आंबेडकर जयंतीनिमित्त  आंबेडकर यांच्या पुस्तकांचे आणि साहित्यांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. या स्टॉलवर अनुयायींनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. तसेच आंबेडकर यांचे फोटो, मूर्ती खरेदी करण्यास अनुयायींनी पसंती दिली. तसेच वही पेन संकलनाच्या आवाहनाला अनुयायांनी चांगला प्रतिसाद दिला.  हजारो वही पेन संकलित झाले.  हे सर्व साहित्य राज्यभरातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून दान केले जाणार आहेत.

आंबेडकर जयंतीनमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पुतळा परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.  पिंपरी चौकात  निळे झेंडे लावण्यात आले होते. तसेच बाबासाहेबांना अभिवादन करणारे फ्लेक्स  लक्ष वेधून घेत होते.  पोलिसांनी वाहतुकीचे काटेकोर नियोजन करून चांगला बंदोबस्त ठेवला होता.