पिंपरीत महागड्या कार विकून देतो असे सांगून व्यावसायिकाला पावनेचार कोटींचा गंडा

0
1121

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – बॅन्टली, मरसर्डिज, बीएमडब्ल्यु आणि फॉरच्युनर या महागड्या कंपनीच्या वापरलेल्या चार कार विकून देतो असे सांगून एका ठगाने व्यावसायिकाला तब्बल ३ कोटी ८० लाखांचा गंडा घातला. ही घटना २०१५ ते फेब्रुवारी २०१९ दरम्यान पिंपरी येथे घडली.

विनय विवेक आरान्हा (वय ४५, रा. २३ अ, नेपीयर रोड, कॅम्प, पुणे) असे फसवणुक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सागर मारुती सुर्यवंशी (वय ३८, रा. बंगलो नं.६८, साऊथ मेन रोड, कोरेगाव पार्क, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विनय आरान्हा यांच्याकडे वापरलेली फॉरच्युनर, बॅन्टली, मरसर्डिज आणि बीएमडब्ल्यु अशा ३ कोटी ८० लाखांच्या चार कार होत्या. सन २०१५ ते फेब्रुवारी २०१९ दरम्यान आरोपी सागर याने विनयला तुझ्या कार विकून देतो असे सांगून चारही कार नेल्या. मात्र सागर याने पैसेही दिले नाहीत तसेच कारही परत केल्या नाहीत. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सागर याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलिस उपनिरीक्षक निकम अधिक तपास करत आहेत.