Pimpri

पिंपरीत पोलीस असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकाला लुटले

By PCB Author

March 18, 2019

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – बॅग तपासण्याचे नाटक करुन एका तोत्या पोलिसाने हातचालाखीने ज्येष्ठ नागरिकाजवळील रोख रक्कम चार हजार रुपये चोरुन नेली. ही घटना रविवारी (दि. १७) दुपारी दोनच्या सुमारास शगुन चौक पिंपरी येथे घडली.

याप्रकरणी सुधाकर पुंडलिक अकोले (वय ७९, रा. चिखली) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुधाकर हे सेवानिवृत्ती शासकीय नोकर आहेत. ते रविवारी दुपारी खरेदीसाठी पिंपरी मधील शगुन चौकात आले होते. खरेदी करत असताना अचानक अंदाजे ५० वय असलेला एक अनोळखी इसम त्यांच्या जवळ आला आणि त्यांना म्हणाला ‘मी पोलीस आहे. मला तुमच्या खिशात गुटखा आहे का, ते चेक करायचे आहे.’ त्यावरून सुधाकर यांनी त्यांचे खिसे दाखवले. त्यावेळी त्यांच्या खिशात चार हजार रुपये होते. ते सर्व पैसे आरोपीने स्वतःच्या हातात घेतले. त्यानंतर सुधाकर यांना बॅग दाखवण्यास सांगितले. हातातील पैसे बॅगमध्ये ठेवतो असे सांगून हातचलाखी करून सर्व पैसे आरोपीने लुटून नेले. पिंपरी पोलीस आरोपी चोरट्याचा शोध घेत आहेत.