पिंपरीत गावठी कट्टयाचा धाखदाखवून रिक्षाचालकाचे अपहरण, काही तासातच पोलिसांनी केली सुटका

0
446

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – हॉर्न वाजवल्याच्या कारणावरुन कारचालकाने गावठी कट्ट्याचा धाक दाखवत रिक्षाचालकाला मारहाण करुन अपहरण केले. ही धक्कादायक घटना मंगळवार (दि.२५) रात्री साडेअकराच्या सुमारास खराळवाडी सुदर्शननगर ते कासारवाडी दरम्यान घडली.

सोमेश्र्वर संगम गिरी (वय २१, रा. कासारवाडी) असे सुटका करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी हितेश प्रल्हाद खेदार (वय २१, रा. रेल्वेगेटखाली शंकर मंदिराजवळ, लांडगेवस्ती रुम नं.२, कासारवाडी) याने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार, कारचालक राजेश विष्णु धोत्रे (वय २४, रा. भागवत गिता मंदिराजवळ, खराळवाडी) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास रिक्षाचालक सोमेश्र्वर आणि हितेश हे दोघे त्यांच्या एका मित्राला रिक्षा (क्र.एमएच/१४/एचसी/१३७०) ने खराळवाडीतील सुदर्शनगर येथे रात्री साडेअकराच्या सुमारास सोडवण्यासाठी आले होते. यावेळी रस्त्याने जात असताना सोमेश्वरने समोरील स्विफ्ट कार (क्र.एमएच/१४/२८७९) वरील चालक राजेश धोत्रे याला हॉर्न दिला. यावर राजेश याने कारमधून उतरुन गावठी कट्ट्याचा धाक दाखवत सोमेश्वर याला मारहाण केली. तसेच त्याला स्विफ्ट कारमध्ये जबरदस्तीने बसवून अपहरण केले. घटनेची माहिती तातडीने पिंपरी पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर काही तासातच रिक्षाचालक सोमेश्वर याची कासारवाडी येथून सुटका करण्यात आली. आणि राजेश याला स्वीफ्ट कारसह अटक केली. मात्र अद्याप गावठी कट्टा सापडलेला नाही. पोलीस उपनिरीक्षक हरिदास बोचरे आणि टिमने घटनेचा तपास केला.