Pimpri

पिंपरीत खूनाच्या गुन्ह्यातील फरार तिघा आरोपींना अटक

By PCB Author

November 15, 2018

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – पिंपरी परिसारत खून करुन फरार झालेल्या तिघा आरोपींना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडील खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.१४) पिंपरीतील मिलिंदनगर आणि तपोवन मंदिर परिसरात करण्यात आली.

कपिल संजय गायकवाड (वय २२, रा. सुभेदार रामजी आंबेडकर वसाहत, कपिल हाऊसिंग सोसायटी, पिंपरी), अक्षय चंद्रकांत भोरे (वय २३, रा. सुभेदार रामजी वसाहत, नव एकता हाऊसिंग सोसायटी, पिंपरी) आणि सिध्दार्थ उर्फ मामू गणेश यादव (य २३, रा. बलदेवनगर, साईचौक, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये एकाचा खून केल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पिंपरी परिसरात खंडणी दरोडा विरोधी पथक गस्त घालत होते. यावेळी एका खबऱ्याकडून पथकाला माहिती मिळाली कि, २०१६ मध्ये पिंपरी परिसरात खून करुन फरार झालेले तीन आरोपी पिंपरीतील मिलिंदनगर परिसरात आले आहेत. पोलिसांनी त्यानुसार तातडीने मिलिंदनगर परिसरात सापळा रचून पहिल्यांचा अक्षय भोरे याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने इतर दोघे आरोपी कपिल आणि सिध्दार्थ हे दोघे पिंपरीतील तपोवन मंदिराजवळ उभे असल्याचे सांगितले. पोलीसांनी त्या ठिकाणी देखील सापळा रचून कपिल आणि सिध्दार्थ या दोघांना अटक केली. त्यांना पोलीसी खाक्या दाखवताच खूनाचा गुन्हा कबुल केला. हे तिघेही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर इतर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.

ही कारवाई खंडणी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे, पोलीस शिपाई अजय भोसले, राजेंद्र शिंदे, शैलेश सुर्वे, आशिष बोटके, शरीफ मुलाणी, आशिष बनकर, किरण काटकर, प्रवीण माने, विक्रांत गायकवाड, गणेश कोकणे यांच्या पथकाने केली.