पिंपरीतील सोनोग्राफी व एक्सरे मशीन फसवणूक प्रकरणातील आरोपीला नवी मुंबई पोलिसांनी १० कोटींच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात घेतले ताब्यात

0
353

पिंपरी, दि. 12 (पीसीबी): पिंपरी चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेने डेहराडून मधून केली होती अटक. कर्ज असलेली वैद्यकीय उपकरणे वैद्यकीय संस्थांना विकून फसवणूक करणाऱ्या आरोपीला पिंपरी चिंचवडच्या आर्थिक गुन्हे शाखेने डेहराडून मधून अटक केली होती. त्यानंतर आरोपीला पोलिस कोठडीत ठेवण्यात आले. पोलिस कोठडी संपल्यानंतर आरोपीला नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. नवी मुंबई मधील एनआरआय सागरी पोलीस ठाण्यात त्या आरोपीवर १० कोटी रुपयांचा आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याने तपासासाठी नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

डॉ. मनीष नंदलाल तरडेजा (रा. जुना नेरुळ, नवी मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पिंपरी पोलीस ठाण्यात आरोपी डॉ. मनीष याच्यासह त्याची पत्नी रचना मनीष तरडेजा हिच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रचनाला अटकपूर्व जामीन मिळाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरोपी हे वे टू डायग्नोस्टिक प्रा ली कंपनीचे डायरेक्टर आहेत. आरोपींनी माता बाल रुग्णालय बेलापूर येथील सोनोग्राफी मशीन, जनरल हॉस्पिटल नेरुळ येथील एक्सरे मशीन, जनरल हॉस्पिटल वाशी येथील दोन सोनोग्राफी मशीन, जनरल हॉस्पिटल ऐरोली येथील एक्सरे मशीन रुबी हेल्थ केअर सर्व्हिसेस प्रा. ली या कंपनीला विकल्या होत्या. आरोपींनी विकलेल्या मशीनवर बँकेचे कर्ज होते. त्याची माहिती आरोपींनी जाणीवपूर्वक लपवून ठेवली. यामध्ये आरोपींनी लाखो रुपयांची फसवणूक केल्याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेने तपास करत आरोपीचा माग काढून त्याला उत्तराखंड मधील डेहराडून येथून अटक केली. त्याला न्यायालयाने 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडी संपल्याने त्याला नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

नवी मुंबई मधील एनआरआय सागरी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात मागील वर्षी (सन 2020) १० कोटी रुपयाचा फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्यातही आरोपी फरार होता. त्याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे नवी मुंबई येथील गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी त्याला नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.