पिंपरीतील मेट्रो स्टेशनच्या आराखड्यात अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचा योग्य विचार न केल्यास काम बंद पाडू; आशाताई धायगुडे –शेंडगेंचा इशारा

859

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – पुणे, मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमध्ये दापोडी ते एम्पायर इस्टेट पुलापर्यंत काम सुरू आहे. दरम्यान, पिंपरीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात मेट्रोचे स्टेशन बांधले जाणार आहे. त्यामुळे अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचा दर्शनी भाग झाकला जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणीचा मेट्रो स्टेशनचा आराखडा बदलण्यात यावा, अन्यथा सोमवारपासून (दि. १९) मेट्रोचे काम बंद पाडण्यात येईल, असा इशारा नगरसेविका आशाताई धायगुडे-शेंडगे, श्रीमंत मल्हारराव होळकर प्रतिष्ठान, कर्मयोगिनी अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान, राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव कमिटी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संघ सांगवी आणि ऑल इंडिया धनगर समाज महासंघ यांनी दिला आहे.

यावेळी सुर्यकांत गोफणे, विजय वाघमोडे, अभिमन्यू गाडेकर, बाबासाहेब चितळकर, अभिजित शेंडगे, विलास महानवर, गोरख खामगळ, संतोष वाघमोडे, भरत महानवर, गणेश आडुळे, दिरू वनमाने, विठ्ठल सरेकर, संजय शेंडगे, सुमित पांढरे, राजू धायुगडे, अशोक उकले, महापालिकेचे अधिकारी श्रीकांत सवने, ज्ञानदेव झुंधारे, विजय भोजने, तर मेट्रोचे अधिकारी नागेश्वर राव, रणजित कुमार, बापू गायकवाड आदी उपस्थित होते.

याबाबत पुणे मेट्रो कार्पोरेशनचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम् यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फुगेवाडी येथील साईट कार्यालयामध्ये ४ सप्टेंबर रोजी मेट्रो अधिकाऱ्यांशी बैठक घेतली होती. यावेळी अधिकाऱ्यांनी पुतळ्याला कोणतीही बाधा पोहचणार नाही, असे आश्वासन दिले होते. परंतु सध्याच्या मेट्रोच्या आराखड्यावरून यामध्ये काहीही सुधारणा किंवा दुरूस्ती केल्याचे साईटवरील कामावरून दिसून येत नाही. सध्याच्या आरखड्यावरून अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा स्टेशनच्या पिलरमुळे झाकला जाणार आहे.

यामुळे अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या सौंदर्यामध्ये बाधा येणार आहे. तसेच समाजाच्या प्रेरणास्थळ काही अंशी कायमस्वरूपी झाकले जाणार आहे. अशा प्रकारे समाजाच्या भावना दुखविण्याचा प्रकार जाणून बुजून केला जात आहे. तसेच महापालिका इमारतीचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा झाकण्याचा खटाटोप करण्यात येत आहे.

समाजाचा मेट्रोच्या कामाला विरोध नाही. परंतु मेट्रो स्टेशनचे काम सुरू करण्यापूर्वी त्याचा नियोजित आराखडा दाखवण्याची विनंती मेट्रोच्या प्रतिनिधींकडे केली होती. परंतू याबाबत आम्हाला कोणतीही पूर्वकल्पना न देता मेट्रो स्टेशनचा आराखडा अंतिम करून आमच्या समाजावर हेतू परस्पर अन्याय करण्यात आला आहे.

महापालिका भवन आवारातील अण्णासाहेब मगर यांचा पुतळा व महापालिका इमारतीचे इलेव्हेशन अबाधित ठेवण्यासाठी मेट्रो स्टेशन अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याकडे स्थलांतरीत करण्यात आले आहे. तसेच स्टेशनचा जिना मोरवाडी चौकाच्या पिंपरीच्या बाजुकडील रस्त्याने सुरू होत आहे. स्टेशनचा काही भाग बरोबर पुतळ्याच्यावर सुमारे २.५० मीटर येत आहे. त्यामुळे पुतळ्यावर संपूर्ण सावली पडणार आहे. तसेच पिलर पुतळ्यासमोर येणार आहे.

त्यामुळे मेट्रो स्टेशनचा आराखडा बदलून स्टेशन अहिल्यादेवी होळकर चौकालगत एम्पायर इस्टेट पुलाच्या बाजूला स्थलांतरीत करण्यात यावे. या चौकातील पीएमपीएमएल बस थांबा, ग्रेड सेपरेटर यांना   ‘अहिल्यादेवी होळकर चौक’ असे नांव देण्यात यावे. त्याचबरोबर मेट्रो स्टेशनची मिरर इमेज करून स्टेशन स्थलांतरीत करणे तांत्रिक दृष्ट्या शक्य नसल्यास सद्यस्थितीतील होळकर यांचा पुतळा मेट्रो स्टेशनच्या खाली येत असल्याने पुतळा मागील जागेत स्थलांतरीत  करून त्यासाठी आवश्यक असणारी १० गुंठे जागेचा ताबा महापालिकेकडे हस्तांतरीत करून पुतळा व परिसर विकसित करून देण्यात यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.