Banner News

पिंपरीतील भिमसृष्टीचे काम अंतिम टप्प्यात; महापालिका पदाधिकाऱ्यांकडून कलाकृतींची पाहणी

By PCB Author

March 28, 2018

भारताच्या घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित भीमसृष्टी पिंपरीतील डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात साकारली जाणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात भीमसृष्टी साकरण्यात येत आहे. त्यासाठी स्थापत्यविषयक कामे अंतिम टप्प्यात सुरू आहेत. भीमसृष्टीतील कलाकृतींना अखेरचा हात देण्याचे काम सुरू आहे. भीमसृष्टीच्या कामाला स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांच्या कार्यकाळात वेग आला. कला संस्कार संस्थेचे प्रमुख आणि पुण्यातील शिल्पकार महेंद्र थोपटे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र साकारले असून या कलाकृतींची सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड यांनी पाहणी केली. लवकरात लवकर  भीमसृष्टी जनेतेसाठी खुली करावी, अशा सूचना त्यांनी प्रशासनास केल्या.

यावेळी नगरसेवक बाबा त्रिभुवन, संतोष कांबळे, सागर अंगोळकर, अंबरनाथ कांबळे, अमित गोरखे, कार्यकारी अभियंता संजय कांबळे आदी उपस्थित होते.

एकनाथ पवार म्हणाले, ‘‘घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाची माहिती शहरवासीयांना व्हावी, या उद्देशाने भीमसृष्टी साकारण्यात येणार आहे. त्यात बाबासाहेबांच्या जीवनांवर आधारित १९ प्रसंगांचा समावेश आहे. त्यातील १५ कलाकृतींचे काम पूर्ण झाले आहे. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घेताना, बालपण, सरकारी दिव्याखाली केलेला अभ्यास, पदवी मिळालेला प्रसंग, बैलगाडीतून खाली उतरविण्याचा प्रसंग, राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना घटना सुपूर्द करताना, नागपूरच्या दिक्षा भूमीत केलेले भाषण, महाड येथील चवदार तळ्याचा प्रसंग, नाशिक येथील काळाराम मंदिर अस्पृशांसाठी खुले केलेला प्रसंग साकारण्यात येणार आहेत.

भीमसृष्टीत म्युरल्सबरोबरच काही कोलाजही असणार आहेत. त्यात मजूरमंत्री म्हणून शपथ घेताना, फोटोग्राफी शिकताना, बौद्ध धर्म स्वीकारताना असे प्रसंग असणार आहेत. पुतळ्याजवळ चार प्रमुख कलाकृती असतील. तसेच पुतळा परिसराच्या सीमाभिंती लगत एकूण १५ कलाकृती उभारण्यात येणार आहेत. बाबासाहेबांवर अभ्यास करणाऱ्या मान्यवरांच्या सूचनांचा अंतर्भावही या कलाकृती निर्माण करताना केला आहे. या कलाकृती अंतिम टप्यात असून, येत्या पाच महिन्यांत भीमसृष्टी शहरवासीयांसाठी खुली करण्याचे नियोजन  आहे. शहराच्या वैभवात आणखी एक भर टाकण्याचे काम भीमसृष्टीच्या माध्यमातून होणार असल्याचे त्यांनी सांगितले.”