पिंपरीतील बाजारपेठा हाऊसफुल्ल, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

0
467

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरातील बाजारपेठा आज सकाळ पासून हाऊसफूल्ल होत्या. शहराला रेडझोनमधून वगळण्यात आल्याने व्यवहार सुरू करायला परवानगी देण्यात आली. त्यामुळे शुक्रवारपासून शहरातील बहुतांश दुकाने खुली करण्यात आली. पिंपरी मेन बजार, चिंचवडची गांधी पेठ, आकुर्डी, निगडी, भोसरी, सांगवी, थेरगाव, कासारवाडी आदी परिसरातील दुकाने खुली होती आणि गिऱ्हाईकांचीही खचाखच गर्दी पहायला मिळाली. दोन महिन्यानंतर दुकानं उघडण्यात आल्याने अनेक ठिकाणी ग्राहकांनी तुफान गर्दी केल्याचे दृष्य होते. यावेळी फिजिकल डिस्टंसिंगचा पुरता फज्जा उडाला. रस्त्यांवरही ठिकठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

शुक्रवारपासून सम-विषम तारखेनुसार शहरातील सर्व दुकाने उघडण्यात आली आहेत. शहरातील पिंपरी बाजारपेठत मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे मार्केट आहे. दोन महिन्यानंतर इथली दुकानं उघडल्याने त्याठिकाणी ग्राहकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, पिंपरी मार्केटमधील एकाच बाजूची दुकान उघडण्यात आली होती. दुचाकीवरुन एकाच व्यक्तीला प्रवासाची मुभा असताना दोन नव्हे तर तीन व्यक्ती सर्रासपणे प्रवास करताना दिसल्या. महापालिका आयुक्तांच्या आदेशाला अनेकांनी केराची टोपली दाखवली आहे.

करोनापासून बचावासाठी दुकांनामध्ये वस्तू विकत घेताना सॅनिटायझर आणि मास्क बंधनकारक आहे मात्र, काही दुकानदारांनी या नियमाचेही उल्लंघन केल्याचे दिसून आले. गेल्या दोन महिन्यांपासून पिंपरी मार्केट बंद होते, त्यामुळे आणखी गर्दी वाढण्याची शक्यता असून दुकानदारांनी नियमांचे पालन न केल्यास दुकानदारांना कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. रस्त्यावर ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त होता तो संपुष्ठात आला आहे. नाक्यावर तपासणी होत होती तीसुध्दा आता संपली आहे. दुकानदारांनी नियमभंग केला तर जाब विचारणारे पोलिसही दिसेनासे झालेत.