पिंपरीतील ‘त्या’ तिघांना केले होम क्वारंटाईन

0
210

पिंपरी, दि. २ (पीसीबी) : दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये आलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या दोघांच्या संपर्कात आलेल्या पिंपरी-चिंचवडमधील अन्य एक जणही कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे. या तिघांवरही पिंपरी कॅम्पमधील नवीन जिजामाता रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिघांचीही प्रकृती आता स्थिर असून त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना होम क्वारन्टाईन करण्यात आले आहे, असे महापालिकेचे सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.

तिघांची प्रकृती स्थिर
दक्षिण आफ्रिकेतील नायजेरियातून दोन जण गुरुवारी पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. या दोघांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर या दोघांच्या संपर्कात आलेल्या एका व्यक्तीचा मंगळवारी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या तिघांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे का हे तपासण्यासाठी त्यांच्या घशातील स्वॅब नमुने जिनोम सिकव्हेंसिंगकरीता पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविण्यात आले आहेत. याचा अहवाल आल्यानंतर ओमिक्रॉनची लागण आहे का ते स्पष्ट होईल.

नायजेरियात अद्याप ओमिक्रॉनचा शिरकाव नाही
आफ्रिका व युरोपीय देशांमध्ये सध्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन विषाणूचा हाहाःकार सुरु आहे. मात्र असे असले तरी नायजेरिया या देशामध्ये तो विषाणू अद्याप आढळून आलेला नाही, असे डॉ. गोफणे यांनी स्पष्ट केले आहे. परदेशातून येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश प्रशासनाने दिले असून त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरात परदेशातून आलेल्यांची तत्काळ तपासणी करण्यात येत आहे.