पिंपरीतील ‘त्या’ चिमुकलीवर झालेल्या अत्याचारास परिसरातील अवैध धंदे आणि विकृत मनोवृत्ती कारणीभूत

0
560

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – पिंपरीतील बौध्दनगर येथे पत्राशेडमध्ये राहणाऱ्या सात वर्षाच्या चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या नराधमाने बलात्काराचा प्रयत्न करुन जीवेठार मारल्याची धक्कादायक घटना घडली. अशा प्रकारे अवघ्या सात वर्षाच्या मुलीवर ओढवलेल्या प्रसंगाला भाटनगर व परिसरात वाढलेले अवैध धंदे कारणीभूत असल्याचा आरोप त्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी केला आहे. रस्त्यांकडेलाच सुरू असणाऱ्या अवैध धंद्यांच्या ठिकाणावरून जाणाऱ्या महिला आणि मुलींना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. या अवैध धंद्यांबाबत पोलिसांकडे तक्रार करूनही मिळत असलेल्या हप्त्यांमुळे त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा विकृत अत्याचारांना कुठे तरी पोलिसही कारणीभूत ठरत असल्याचे चित्र आहे.  

या घटनेचा निषेध करण्यासाठी शनिवारी (दि.२९) अन्याय अत्याचार प्रतिबंधक कृती समितीच्या वतीने निषेध मोर्चा आणि श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भाटनगर, बौध्दनगर आणि रमाबाईनगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महिलांचा देखील लक्षणीय सहभाग होता. निषेध रॅली आणि सभेत सहभागी सर्व नागरिकांनी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

तसेच पिंपरीतील मृत मुलगी राहत असलेला परिसर हा संवेदनशील असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु आहेत. या ठिकाणी विकृत मनोवृत्ती असलेल्या गुन्हेगारांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. त्यामुळे या परिसरातील महिला भीतीच्या सावटाखाली वावरत असतात. सात वर्षीय चिमुकलीचा बळी गेल्यानंतर येथील महिला अन्याय, अत्याचाराविरोधात पेटून उठल्या असून त्यांनी गुन्हेगारावर कारवाई करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. तर गुन्हेगारी कारवायांना  आळा घालण्यासाठी पिंपरी परिसरातील मटका, जुगार, दारु विक्री व्यावसायिकांवर कारवाई करुन ते बंद करण्याची मागणी उपस्थितांनी यावेळी पोलिस प्रशासनाकडे केली.