Pimpri

पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालयाचे मरकळ गावात १०० तास स्वच्छता अभियान

By PCB Author

July 25, 2018

पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) – पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र तसेच सरकारचे मानव संसाधन विकास मंत्रालय आणि पेयजल व स्वच्छता मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने खेड तालुक्यातील मरकळ येथे १०० तास स्वच्छ भारत इंटर्नशिप अभियान राबविण्यात आले.

या स्वच्छता अभियानासाठी महाविद्यालयाने १० विद्यार्थ्यांचा गट तयार केला होता. या विद्यार्थ्यांनी ४ जून ते १० जुलै यादरम्यान तब्बल १०० तास हे अभियान राबविले. या अभियानांतर्गत ग्राम स्वछता, स्वछता सर्व्हे, वृक्षारोपण, स्त्रियांसाठी आरोग्य तपासणी, पथनाट्याद्वारे स्वछता आणि प्लास्टिक मुक्तीचा संदेश, हागणदारीमुक्त गाव, औषध फवारणी, स्वछता आणि प्लास्टिकमुक्तीसाठी गावकऱ्यांच्या मुलाखती, अंगणवाड़ी कर्मचाऱ्यांची मुलाखत आणि सर्व्हे, लसीकरणविषयी जनजागृती, नदी स्वछता, कम्पोस्ट खत तया करणे, भिंतीवर स्वछता संदेश लिहिणे आदी विविध उपक्रम राबविण्यात आले.

या स्वच्छता अभियानात मरकळ ग्रामस्थांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी सरपंच मंगल खांडवे, माजी सरपंच रोहिदास लोखंडे आदी उपस्थित होते. महाविद्यालयाचे स्वच्छता अभियानाचे नोडल ऑफिसर डॉ. संतोष कांबळे, एनएसएस ऑफिसर डॉ. प्रकाश माने, जनसंपर्क अधिकारी भारती मराठे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. या अभियानासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मेधा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.